`लापता लेडीज` चित्रपट पाहिल्यावर सलमान खानचे ट्वीट, म्हणाला `किरण माझ्यासोबत...`
सर्वसामान्य प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही `लापता लेडीज` या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. आता अभिनेता सलमान खानने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
Laapataa Ladies Review : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच सुपरहिट ठरत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही 'लापता लेडीज' या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. आता अभिनेता सलमान खानने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूडचा दबंग अशी ओळख असलेला अभिनेता म्हणून सलमान खानला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. सलमान खानने नुकतंच बहुचर्चित 'लापता लेडीज' हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमान खानने त्याच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
सलमान खान काय म्हणाला?
"मी नुकताच किरण रावचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट पाहिला. वाह वाह किरण. मला आणि माझ्या वडिलांनाही हा चित्रपट पाहून खूप आनंद झाला. तसेच तू दिग्दर्शक म्हणून पदार्पण केल्याबद्दलही तुझे अभिनंदन, छान काम केलं आहेस. आता माझ्यासोबत कधी काम करणार?" असे ट्वीट सलमान खानने केले आहे. त्याबरोबर "तिला माझ्यासोबत कधी काम करणार?" असा प्रश्नही विचारला आहे.
दरम्यान 'लापता लेडीज' हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण रावने केले आहे. आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली लापता लेडीज या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात रवी किशन, नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि छाया कदम हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकताना दिसत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 9.05 कोटींची कमाई केली आहे.
'लापता लेडीज' हा चित्रपट पत्नींच्या अदलाबदलीवर आधारित आहे. यात दोन महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. यात नवीनच लग्न झालेला दीपक त्याच्या पत्नीला घरी घेऊन जातो, तेव्हा अचानक त्याची पत्नी वाटेत ट्रेनमध्ये हरवते. तो दुसऱ्याच कोणत्या नववधूला आपली पत्नी म्हणून घरी घेऊन येतो. घरी गेल्यावर बायकोच्या डोक्यावरील पदर उचलताच त्याला पत्नीची अदलाबदली झाल्याचे समजते आणि यानंतर एकच गोंधळ पाहायला मिळतो, असे कथानक या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.