Loksabha Election 2019 : आगामी निवडणुकांविषयी संजूबाबाचा महत्त्वाचा निर्णय
खुद्द संजय दत्तनेच दिली या निर्णयाची माहिती
मुंबई : Loksabha Election 2019 लोकसभा निवडणूकांच्या प्रचाराचं रणशिंग सध्या अनेक पक्षांनी फुंकलं आहे. निवडणुकांच्या या रिंगणात क्रीडा विश्वापासून कला विश्नातील काही चेहरेसुद्धा मोठ्या हिरीरिने सहभागी होताना दिसत आहे. याच वातावरणात अभिनेता संजय दत्त याने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आपण, येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षातर्फे उमेदवारी न घेतल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. निवडणूक न लढवण्याची घोषणा त्याने एका ट्विटच्या माध्यमातून केली.
'मी आगामी निवडणुकांमध्ये सहभागी होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. पण, ही बाब खरी नाही. माझ्या देशाला आणि बहिणीला माझी नेहमीच साथ असेल', असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं. आपण निवडणूक लढवणार नसल्याचं म्हणत संजूबाबाने सर्व मतदारांना मोठ्या संख्येने या मतचदान प्रक्रियेत सहभागी होण्याची विनंती केली. त्याचं हे ट्विट पाहता निदान तो निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा शमतील, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला संजय दत्त त्याच्या आगामी 'कलंक' या चित्रपटाच्या प्रसिद्धीवरच लक्ष केंद्रीत करत आहे हे खरं.
फक्त संजय दत्तच नव्हे, तर गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान हासुद्धा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, अखेर त्यानेही ट्विट करत आपण निवणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. अभिनयाकडून राजकीय क्षेत्राकडे वळणाऱ्या कलाकारांमध्ये या नव्या पिढीतील कोणता चेहरा सहभागी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास, हेमा मालिनी, परेश रावल, शत्रुघ्न सिन्हा, राज बब्बर, किरण खेर हे काही चेहरे राजकीय पटलावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे.