मुंबई : 'मै तेरा हाय रे जबरा हाय रे जबरा फॅन हो गया....' हे गाणं म्हटलं की लगेचच डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे अभिनेता शाहरुख खान आणि त्याचे असंख्य चाहते. एखाद्या कलाकारावर प्रेक्षकांचं कितपत प्रेम असू शकतं याच्या परिसीमा शाहरुखच्या चाहत्यांनी अनेकदा ओलांडल्याचं पाहायला मिळालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे या साऱ्याची पुनरावृत्तीही झाल्याचं निदर्शनास आलं आहे. 'झिरो', या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर शाहरुखने त्याच्या वाढदिवसाच्या आणि दिवाळीच्या निमित्ताने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. 


किंग खानच्या या पार्टीला बऱ्याच बी- टाऊन कलाकारांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. याचवेळी त्याच्या मन्नत या बंगल्याबाहेर चाहत्यांचीही तोबा गर्दी पाहायला मिळाली. गर्दीतूनच वाट काढत त्याच्या एका चाहत्याने शाहरुखच्या बंगल्याच शिरण्याचा प्रयत्न केला. 


पण, हा प्रयत्न करुनही कोलकात्याहून आलेल्या मोहम्मद सलीम अहमद नामक चाहत्याला शाहरुखची भेट घेणं शक्य झालं नसल्यामुळे त्याने स्वत:वरच ब्लेडने वार करुन घेतल्याचं पाहायला मिळालं. 


पोलिसांनी त्या चाहत्याला लगेचच ताब्यात घेतलं असून, त्याला रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर त्याला सोडूनही देण्य़ात आलं. 


आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या म्हणजेच शाहरुखच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा चाहता कोलकात्याहून मुंबईत आला होता. पण, दोन दिवस वाट पाहूनही किंग खानची भेट न झाल्यामुळेच त्याने हे धोकादायक पाऊल उचलल्याचं कळत आहे.