मुंबई : आगामी चित्रपट, विविध कार्यक्रम आणि इतर अनेक कामांमध्ये व्यग्र असणाऱ्या अभिनेता शाहरुख खान याने कायमच काही समाजोपयोगी कामांमध्येही त्याचा हातभार लावला आहे. गरजूंना मदत करण्यापासून सेविभावी आणि स्वयंसेवी संस्थांमध्येही त्याचं मोलाचं योगदान पाहायला मिळतं. सध्याही तो चर्चेत आहे ते म्हणजे अशाच एका कृतीमुळे.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीर फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शाहरुख नेहमीच काही महत्त्वाच्या आणि तितक्याच लक्षवेधी कामांमध्ये हातभार लावत असतो. समाजातील काही महत्त्वाच्या घटकांना एक नवी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो. अशा या किंग खानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो त्याच्या कोणत्या आगामी चित्रपटाविषयीचे नसून, ते आहेत एका ऍसिड हल्ल्यातील पीडितेच्या विवाहसोहळ्याचे. 


मीर फाऊंडेशनशी जोडल्या गेलेल्या अनुपमा हिच्या नव्या जीवनाची सुरुवात झाल्याचं औचित्य साधत शाहरिखने सोशल मीडियावर तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या. 


'अनुपमाला खुप साऱ्या शुभेच्छा या नव्या सुरुवातीसाठी... तुझा हा प्रवास आनंदाने परिपूर्ण असो', अशा शब्दांत तिला शुभेच्छा देत शाहरुखने तिच्या पतीचंही कौतुक केलं आहे. किंग खानच्या या शुभेच्छा अनुपमासाठीही तितक्याच खास असणार यात शंका नाही. 



मीर फाऊंडेशन एस अशी संस्था आहे, ज्यामध्ये समाजाच्या विविध स्तरातील महिलांचं विश्व पाहता त्या अनुशंगाने त्यांच्या सबलीकरणासाठी पावलं उचलण्यात येतात. देशभरातील ऍसिड हल्ला पीडितांना आधार देण्याकडे या संस्थेचा विशेष कल असतो. पीडितांना मानसिक आधार देण्यापासून त्यांचा वैद्यकीय खर्च, आर्थिक मदत आणि प्रशिक्षण या साऱ्या मार्गांनी पुन्हा जीवनात नव्या जोमाने उभं राहण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. 



फक्त ऍसिड हल्ल्यातील पीडितांसाठीच नव्हे, तर देशभरातील विविध रुग्णालयांमध्ये असणाऱ्या गरजू महिला आणि लहान मुलांच्या उपचारासाठीही ही संस्था पुढाकार घेते. याव्यतिरिक्त संस्थेकडून आरोग्य शिबीरं, चित्रपटांचं स्क्रीनिंग, दिव्यांग महिला आणि लहान मुलांसाठी बहुविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं.