Photo : शाहरुखच्या मुलाचा अरेस्ट मेमो व्हायरल
एनसीबीच्या अधिकाऱ्यानी कारवाई करत अंमली पदार्थ जप्त केले होते.
मुंबई : बॉलिवूडचा स्टार अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला रविवारी एनसीबी अर्थात नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आली. अंमली पदार्थांचं सेवन, विक्री आणि ते पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आलं.
आपल्याला अटक करण्यात आलेल्या परिस्थितीची जाण असल्याचं म्हणत त्यानं सदर प्रकरणाची माहिती त्याच्या कुटुंबाला दिली. शनिवारी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजात एनसीबीच्या अधिकाऱ्यानी कारवाई करत अंमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तर 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील या रेव्ह पार्टीची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळताच त्यांनी काम सुरु केलं. मागील 15 दिवसांपासून NCB ची टीम या ऑपरेशनची तयारी करत होती. शनिवारी सकाळी 20 ते 22 अधिकाऱ्यांचे पथक सर्च वॉरंट घेऊन एनसीबी कार्यालयातून निघाले. सर्व अधिकारी साध्या वेशात होते, त्यामुळे ते कोणत्याही अडचणीशिवाय आणि शंका येणार नाही असे पार्टीत सहभागी झाले. पण पार्टी सुरू होण्याआधीच एनसीबीने तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी सर्वांना खोलीत नेले आणि तेथे त्यांची कसून झडती घेण्यात आली.