मुंबई : 'कबीर सिंग' या चित्रपटातून कलाविश्वात दमदार आणि सुपरहिट चित्रपट देणारा शाहिद कपूर कॅमेऱ्यासमोर जितका सराईतपणे वावरतो, त्याला तितक्याच आव्हानांचा सामना दैनंदिन आयुष्यात करावा लागतो. बरं ही आव्हानं कशी? तर ही आव्हानं म्हणजे नात्यात गरजेचा असणारा समतोल, काम आणि नात्यांमध्ये असणारा मेळ आणि बरंच काही या स्वरुपाची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत शाहिदने त्याच्या मनातील काही गोष्टींना व्यक्त होण्यास वाव दिला. मीरा राजपूत हिच्यासोबत शाहिदने लग्नगाठ बांधली. पण, कामाच्या वाढत्या व्यापात आपण पत्नीला फार वेळ देत नसल्याची बाब त्याच्या मनात सलते आहे. अनेकदा मीराच्या मनात आपण तिला महत्त्व देत नसल्याची भावना घर करते हेसुद्धा शाहिदने या मुलाखतीत सांगितलं. 


सारंकाही व्यवस्थित सुरु आहे, असं कायम गृहित धरण्याची गरज नाही. कारण गोष्टी सुरळीत सुरु आहेत असा विश्वास जेव्हा तुम्हाला होतो तेव्हाच काहीतरी गोंधळ होतो, असं तो म्हणाला. म्हणूनच प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक दिवशी काम करत रहावं लागतं. लग्न, पालकत्व, करिअर आणि इतरांशी असणारं आपलं नातं या प्रत्येक गोष्टीत आपण कायम अडखळलो असंही शाहिदने स्पष्ट केलं. 


काम आणि खासगी आयुष्यामध्ये समतोल राखण्यास आपण अपयशी ठरल्याचं तो म्हणाला. लग्नानंतरचा काळ काहीसा आव्हानात्मक होता, असं म्हणत विशेष म्हणजे तो मीरासाठी कठिण असावा, असं शाहिदने या मुलाखतीत सांगितलं. 



'फार कमी वयातच तिचं लग्न झालं. दोन मुलं झाली, त्यांच्या संगोपनाचा भार तिच्यावर आला. हे सारं अशावेळी होत होतं जेव्हा तिसुद्धा बालपणातून बाहेरच पडत होती. तिचीही काही स्वप्न असतीलच. पण, तिने ती दूर लोटली. खूप गोष्टी होत्या ज्याला ती सामोरी गेली', असं म्हणत दोघांच्याही वयात असणाऱ्या १३ वर्षांच्या अंतरावर त्याने प्रकाश टाकला. अनेकदा आपण एकमेकांचे खूप खास मित्र असतो, पण कित्येकदा एकमेकांना समजून घेता य़ेत नाही हे वास्तवही त्याने सर्वांसमोर ठेवलं. पत्नीसोबतचं शाहिदचं हे नातं पाहता एक अभिनेता म्हणून तो जितका यशस्वी आहे तितकाच एक पती म्हणून जबाबदार आहे, हे स्पष्ट होत आहे.