मुंबई :  संपूर्ण जगाला संकटाच्या दरीत लोटणाऱ्या Coronavirus कोरोना विषाणूने भारतातही तणावाची परिस्थिती निर्माण केली. याच पार्श्वभूमीवर सावधगिरीची पावलं उचलत देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यांच्या या निर्णयानंतर तीन टप्प्यांमध्ये देशात लॉकडाऊनचं पालन करण्यात येत आहे. पण, या परिस्थितीमध्ये स्थलांतरित मजुरांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक दिवस हाताला काम नाही आणि खायला अन्न नाही अशा अवस्थेचाही काही मजुरांना सामना करावा लागला. समाजातील याच घटकाप्रती आपली जबाबदारी ओळखत आता एका बॉलिवूड अभिनेत्याने स्वखर्चाने मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचा निर्णय घेतला. अतिशय स्तुत्य असं पाउल उचलल्यामुळे सोशल मीडियापासून कलाविश्वापर्यंत हा अभिनेता प्रशंसेस पात्र ठरत आहे. 


जवळपास १० प्रवासी बसची सोय करुन कर्नाटकच्या दिशेने अनेक मजुरांना रवाना करणारा हा अभिनेता आहे सोनू सूद. मुख्य म्हणजे या मजुरांसाठी वाहतूक व्यवस्थेची सोय करण्यापूरताच मर्यादीत न राहता सोनू या बस निघतेवेळीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिला होता. त्याने यादरम्यान मजुरांना कर्नाटकमध्ये पाठवण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांकडून रितसर परवानगीही घेतल्याचं म्हटलं जात आहे. 


'सध्या आपण सारेच एका वैश्विक संकटाता सामना करत आहोत. अशा वेळी प्रत्येक भारतीयाने त्याच्या कुटुंबासमवेत किंवा प्रियजनांसोबत असावं असं मला प्रकर्षाने वाटतं. मी महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रशासनाकडून जवळपास दहा बसच्या माध्यमातून या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठीची रितसर परवानगीही घेतली', असं सोनू म्हणाला. 


वाचा : मुलाकडे BMW पण वडिलांकडे एकही कार नाही; जाणून घ्या ठाकरे पितापुत्रांची संपत्ती 


 


ठाण्यातून निघालेल्या या बस कर्नाटकमधील गुलबर्गा येथे मजुरांना सोडणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून स्वगृही परतण्यासाठी मजुरांची सुरु असणारी पायपीट पाहून सोनूने त्यांच्यासाठी वाहतुकीच्या साधनाची सोय करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या या निर्णयात महाराष्ट्र राज्य प्रशासनाने चांगली साथ दिल्याचंही तो म्हणाला. इतक्यावरच न थांबता आपण, इतर राज्यांतील मजुरांना त्यांच्या मुळ राज्यांत पाठवण्यासाठीही पावलं उचलणार असल्याचा मानस त्याने व्यक्त केला. शिवाय या मजुरांसाठी प्रवासाच्या मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्याची विनंतीही त्याने शासनाकडे केली.