मुलाकडे BMW पण वडिलांकडे एकही कार नाही; जाणून घ्या ठाकरे पितापुत्रांची संपत्ती

बऱ्याच चर्चा आणि राजकीय घडामोडींच्या सत्रात अखेर ...   

Updated: May 11, 2020, 05:15 PM IST
मुलाकडे BMW पण वडिलांकडे एकही कार नाही; जाणून घ्या ठाकरे पितापुत्रांची संपत्ती     title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई :  बऱ्याच चर्चा आणि राजकीय घडामोडींच्या सत्रात अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखस केला. ज्याअंतर्गत त्यांनी आपल्या अधिकृत संपत्तीचा आकडाही जाहीर केला. सध्या राजकीय वर्तुळात त्यांच्या संपत्तीच्या आकड्यानेच सर्वांचं लक्ष वेधलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यापूर्वी त्यांचा मुलगा म्हणजेच वरळी विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांची अधिकृत संपत्ती जाहिर केली होती. 

मुख्यमंत्र्यांनी त्यांची संपत्ती जाहीर करताच आता त्यांच्या मुलासोबत या संपत्तीच्या आकड्यांची मांडणी होत असून ठाकरे कुटुंबाच्या एकूण संपत्तीचा अंदाज लावला जात आहे. 

सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांची एकत्रित अधिकृत संपत्ती जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा आकडा एकूण १२५ कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती समोर आली. या संपत्तीमध्ये त्यांच्या एकूण ३ बंगल्यांचाही समावेश आहे. 

वाचा : वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल

 

तीन बंगल्यांपैकी एक म्हणजे वांद्रे पूर्व कला नगर येथील 'मातोश्री' बंगला, 'मातोश्री'च्या अगदी समोर बांधलं जात असणारं नवं घर आणि कर्जत येथे असणारं त्यांचं फार्म हाऊस यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत पाहता त्यामध्ये त्यांच्याकडे विविध कंपन्यांची भागीदारी आणि त्याचे डिव्हिडंड असल्याची बाबही समोर येत आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वत:च्या मालकीचं एकही खासगी वाहन नसल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. 

आदित्य ठाकरेंच्या संपत्तीचा आकडा किती? 

आदित्य ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या त्यांच्या संपत्तीचा आकडा ११ कोटी ३८ लाखांच्याही वर असल्याचं उघड झालं होतं. यामध्ये १० कोटी ३६ लाखाच्या बॅंक ठेवी, २० लाख ३९ हजारांचे बॉंड शेअर, बीएमडब्ल्यू कार (६ लाख ५०हजार), ६४ लाख ६५ हजाराचे दागिने तसेच १० लाख २२ हजार अशी रक्कम होती.

आदित्य यांची स्थावर मालमत्ता ४ कोटी ६७ लाख आणि गुंतवणूक ११ कोटी ३८ लाख असून एकूण १६ कोटी ५ लाख ५ हजार २५८ रूपये ही त्यांची जाहीर केलेली मालमत्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं.  

 

कल्याणमधील श्रीजी आर्केडमध्ये शॉप( १२५० चौफूट )हा आई रश्मी ठाकरेंने आदित्य यांना आँगस्ट २०१९ मध्ये गिफ्ट दिला आहे. याची किंमत ८९ लाख ४० हजार तसेच घोडबंदर शॉप ( १५०८ चौफूट) ३ कोटी किंमतीचा आहे. या शॉपची किंमत ३ कोटी ८९ लाख ४० हजार होते. खालापूरमध्ये ५ वेगवेगळी सर्व्हेची शेतजमीन असून त्याची किंमत ७७ लाख ६६ हजार आहे, अशा एकंदर संपत्तीची मालकी आदित्य यांच्याकडे असल्याचं उघड झालं होतं. तेव्हा आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांची एकूण संपत्ती पाहता, यात सरशी कोणाची हे लक्षात आलं असेलच.