मुंबई : प्रसिद्ध  बॉलिवूड अभिनेते टॉम अल्टर यांचे ६७ व्या वर्षी निधन झाले. त्वचेच्या कर्करोगाने ते आजारी होते. त्यांनी ३०० हून अधिक सिनेमात काम केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉम अल्टर यांनी शुक्रवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास गेतला. काही दिवसांपूर्वी अंगदुखीच्या त्रासामुळे त्यांना मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदान केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 


अमेरिकन वंशाचे भारतीय अभिनेते टॉम अल्टर यांनी १९७६ मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘चरस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘शतरंज के खिलाडी’, ‘गांधी’, ‘क्रांती’, ‘बोस : द अनफरगॉटन हिरो’ आणि ‘वीर झारा’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली. मात्र ‘जबान संभालके’ (१९९३-१९९७) या शो (सिटकॉम) नंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले.  


तसेच, अनेक टीव्ही मालिकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. ‘जुनून’ या मालिकेत त्यांनी साकारलेली गँगस्टर केशव कलसीची भूमिका खूप गाजली होती. ‘जुगलबंदी’, ‘भारत एक खोज’, ‘घुटन’, ‘शक्तीमान’, ‘मेरे घर आना जिंदगी’, ‘यहाँ के हम सिकंदर’ आदी मालिकांमधूनही त्यांनी अभिनयाची छाप पाडली.
 
ते दिग्दर्शन क्षेत्रातही काम करत होते. १९८० ते १९९० या दशकात त्यांनी क्रीडा पत्रकारिताही केली. क्रिकेट जगतात पाऊल ठेवण्यास सज्ज असणाऱ्या सचिन तेंडुलकरची टीव्हीवर मुलाखत घेणारे टॉम अल्टर पहिले पत्रकार होते.  त्यांना २००८मध्ये केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.