भारत-चीन सीमेवर गस्त घालण्यासाठी `या` अभिनेत्याची निवड
समुद्रसपाटीपासून १४ हजार फुटांवर तैनात जवानांसोबत करणार वेळ व्यतीत
मुंबई : देशासाठी काहीतरी योगदान द्यावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. भारतीय संरक्षण दलांच्या विविध विभागातर्फे यासाठीच्या संधीही देण्यात येतात. ज्य़ामध्ये बहुविध मार्गांनी देशाच्या सेवेत आपलं योगदान देता येतं. पण, त्यातही जीवनाच्या या प्रवासात सैन्य़दलात सहभागी होण्याची अनेकांचीच इच्छा असते.
प्रत्येकालाच ही इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळते असं नाही. पण, ही संधी मिळणाऱ्यांप्रती देशवासियांच्या मनात अपार आदर असतो हे मात्र खरं. सध्याच्या घडीला एका बॉलिवूड अभिनेत्याला देशाच्या संरक्षणार्थ दिल्या जाणाऱ्या सेवेत त्याचं योगदान देण्याची संधी देण्यात आली आहे.
How's the josh, high sir!, असं म्हणणारा तो अभिनेता आहे विकी कौशल. स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवसांपूर्वीच विकीला एक मोठी संधी मिळाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने याविषयीची माहिती दिली. विकी येत्या काही दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेश येथील तवांग येथे असणाऱ्या भारत- चीन सीमेवर असणाऱ्या जवानांसोबत गस्त घालत त्यांच्यासोबत काही क्षण व्यतीत करणार आहे.
समुद्रसपाटीपासून जवळपास १४ हजार फूट उंचीवर देशसंरक्षणासाठी तैनात असणाऱ्या सैन्यदलाच्या तुकडीसोबत वावरण्याची संधी मिळाल्याबद्दल विकीने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. ही पोस्ट आणखी खास ठरत आहे ती म्हणजे सोबत जोडलेल्या फोटोमुळे. ज्यामुळे खऱ्याखुऱ्या सैनिकांच्या साथीने तो दिसत असून, दोन्ही हात जोडून तो भारत मातेच्या या शूरवीरांसमोर कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहे.