बॉक्स ऑफिसवर `उरी`चा जोश कायम, कमाईच्या आकड्याने गाठली इतकी उंची....
#Uri #HowsTheJosh
मुंबई : 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाला चांगलीच टक्कर देत बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे उंचावण्याचं सत्र सुरूच ठेवलं आहे. विकी कौशलची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता बरेच दिवस उलटले असून, प्रेक्षकांमध्ये असणारी या चित्रपटाची लोकप्रियता काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे.
आदित्य धर दिग्दर्शित 'उरी....'च्या कमाईचे आतापर्यंतचे आकडे पाहता येत्या काही दिवसांमध्ये २०० कोटींच्या घरात ते पोहोचण्याची चिन्हं आहेत. सध्या या चित्रपटाने १५० कोटींच्या कमाईचा आकडा ओलांडला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन याविषयीची माहिती दिली. 'उरी'ने तिसऱ्या आठवड्यातही दमदार कामगिरी सुरु ठेवली असून, आतापर्यंत चित्रपटाची कमाई, १५७. ३८ कोटींवर पोहोचली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
विकी कौशल, मोहित रैना, यामी गोतम, परेश रावल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'उरी....' या चित्रपटातून भारतीय सैन्यदलाने केलेल्या एका महत्त्वाच्या कारवाईवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात दहशतवादी कारवायांची पाळंमुळं असणाऱ्या दहशतवादी तळांचा नायनाट करत भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी एक महत्त्वाची कारवाई केली होती. त्यावरच भाष्य करत हा थरार रुपेरी पडद्यावर उरीच्या निमित्ताने उतरवण्यात आला. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला होता, तो आजच्या दिवसापर्यंत कायम आहे. त्यामुळे एका अर्थी 'उरी'चा जोश... कायम आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.