अजय देवगणला नमस्कार केला नाही म्हणून चित्रपटातून काढलं! ज्येष्ठ अभिनेत्याचा दावा, निर्माते म्हणाले...
आपण अजय देवगणला नमस्कार न केल्याने आपल्याला सन ऑफ सरदार 2 चित्रपटातून काढण्यात आलं असा दावा अभिनेता विजय राज यांनी केला आहे. निर्मात्यांनी मात्र त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.
अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2’ चे चित्रीकरण सध्या यूकेमध्ये सुरू आहे. संजय दत्त या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर आता अभिनेता विजय राज यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे. निर्माते कुमार मंगत यांच्या म्हणण्यानुसार, विजय यांना असभ्य वर्तन, सहकार्याचा अभाव आणि न संपणाऱ्या मागण्या या कारणांमुळे चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे. विजय राज यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण अजय देवगणला नमस्कार न केल्याने काढून टाकले असा दावा केला आहे.
कुमार मंगत यांनी Pinkvilla ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, विजय राज यांना हाताळणं निर्माते आणि क्रूला फार कठीण जात होते. “होय, हे खरे आहे की आम्ही विजय राजला त्याच्या सेटवरील वागणुकीमुळे चित्रपटातून काढून टाकले आहे”, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘विजयने एका मोठ्या खोलीची आणि त्याच्या स्पॉट बॉयला 20,000 रुपये देण्याची मागणी केली. त्याने मोठ्या खोल्या, व्हॅनिटी व्हॅनची मागणी केली आणि स्पॉट बॉईजसाठी आमच्याकडून जास्त शुल्कही घेतले. त्याच्या स्पॉट बॉयला प्रति रात्र 20,000 रुपये दिले जात होते जे कोणत्याही मोठ्या अभिनेत्यापेक्षा जास्त आहे. यूके हे एक महागडे ठिकाण आहे आणि शूटिंगदरम्यान प्रत्येकाला योग्य रूम मिळाल्या, परंतु त्याने प्रीमियम सूटची मागणी केली. जेव्हा आम्ही त्याला खर्चाची परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने समजून घेण्यास नकार दिला आणि उद्धटपणे बोलला. ‘तूच माझ्याकडे आलास, मी तुझ्याकडे काम मागायला आलो नाही’, अशी त्यांची सतत प्रतिक्रिया असायची. त्याची नाटके वाढत चालली hoti. त्यांनी तीन कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यासाठी दोन कारची मागणी केली,”.
मात्र, विजय राज यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पहिल्या दिवशी सेटवर अजय देवगणला अभिवादन न केल्यामुळे चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले क, “मी वेळेआधीच त्या ठिकाणी पोहोचलो जिथे अभिनेता रवी किशन, कार्यकारी निर्माता आशिष, निर्माता कुमार मंगत आणि चित्रपट निर्माते विजय अरोरा मला भेटायला आले होते. मी व्हॅनमधून बाहेर पडलो आणि अजय देवगणला पाहिले, जो माझ्यापासून 25 मीटर दूर उभा होता. तो व्यस्त असल्याने मी त्याला नमस्कार केला नाही. काही मिनिटांनंतर मंगत माझ्याकडे आले आणि म्हणाले, 'तुम्ही चित्रपट सोडू शकता, आम्ही तुम्हाला काढून टाकत आहोत”.
मोठ्या खोलीच्या मागणीवर ते म्हणाले की, सकाळी योगासन करण्यासाठी थोडी जागा हवी होती. 26 वर्षे इंडस्ट्रीत असताना मी ही मागणी करू शकत नाही का?" पुढे ते म्हणाले, “माझ्याकडून एकच गैरवर्तन झाले की मी अजय देवगणला अभिवादन केले नाही. मी क्रूलाही भेटलो नाही आणि हे एकमेव लोक आहेत ज्यांच्याशी मी संवाद साधला. सेटवर पोहोचल्यानंतर ३० मिनिटांनी मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले, कारण मी अजय देवगणला अभिवादन केले नाही. हे शक्तिशाली लोक आहेत आणि गैरवर्तनाचा प्रश्न येत नाही.”
कुमार मंगत यांनी अजय देवगणला अभिवादन न केल्यामुळे काढून टाकल्याचा विजय यांचा दावा फेटाळला. “विजय यांना काढून टाकल्यामुळे आम्हाला किमान दोन कोटींचे नुकसान झाले आहे. अशा छोट्या गोष्टींसाठी आम्ही इतके कठोर पाऊल उचलणार नाही. त्याचे वर्तन चिंतेचे कारण होते,” असे त्यांनी सांगितले .
त्यानंतर मंगत म्हणाले की, विजय राज यांच्या टीममधील एका व्यक्तीवर हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचा आरोप केला होता. “आम्हाला हॉटेलकडून अधिकृत ई-मेल आला. सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. मी म्हटल्याप्रमाणे, विजय राज यांच्याशी संबंध तोडण्यात आम्हाला आनंद होत आहे आणि आम्ही अशा व्यक्तीसोबत काम करू इच्छित नाही,” असे ते म्हणाले. मात्र, निर्माते दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करत असल्याचा दावा विजय यांनी केला. ते म्हणाले , “दोन घटनामध्ये किमान 10 तासांचा फरक आहे. मला 4 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि हॉटेलमधील प्रकार त्याच दिवशी रात्री 11 वाजता झाला. याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी आता स्पॉट बॉयसोबत काम करत नाही.”