मुंबई : एक्झिट पोल, ओपिनियन पोल आणि निकाल यातील फरक स्पष्ट करण्यासाठी म्हणून अबिनेता विवेक ओबेरॉय याने एक मीम सोशल मीडियावर शेअर केलं आणि त्याच्यावर सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. कला विश्वातील सेलिब्रिटी मंडळींपासून महिला आयोगापर्यंत सर्वांनीच त्याच्या या कृतीवर नाराजीचा सूर आळवला. आपण, फक्त एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली असून त्या प्रकरणी माफी मागण्यास विवेकने स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. पण, होणारा विरोध पाहता त्याला शरणागती पत्करावी लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अनेकदा कोणा एकाला विनोदी आणि कोणासाठीही त्रासदायक ठरणार नाहीत असं वाटणाऱ्या गोष्टी इतरांनाही त्याच दृष्टीकोनातून दिसतीलच असं नाही. मी गेल्या दहा वर्षांपासून २ हजारहून जास्त महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत आहे. कोणा एका महिलेचा अनादर करण्याचा विचारही मी करु शकत नाही', असं ट्विट त्याने केलं. यासोबतच आणखी एक ट्विट करत त्याने माफी मागत ते वादग्रस्त ट्विट डिलीट केल्याचं स्पष्ट केलं. 



विवेकने केलेल्या या ट्विटनंतर तरी आता त्याच्यावर उठलेली टीकेची झोड थांबणार का, याकडेच अनेकांचं लक्ष आहे. 


काय होतं त्या ट्विटमध्ये? 


विवेकने शेअर केलेल्या मीममध्ये सलमान आणि ऐश्वर्याचा फोटो असणाऱ्या भागावर 'ओपिनियन पोल' असं लिहिलं होतं. खुद्द विवेक आणि ऐश्वर्याचा फोटो असणाऱ्या भागावर 'एक्झिट पोल' असं लिहिण्यात आलं होतं. तर, अभिषेक बच्चनसोबतच्या तिच्या फोटोवर 'रिझल्ट्स' अर्थात निकाल असं लिहिण्यात आलं होतं. हे मीम शेअर करताना त्याने कॅप्शन देत लिहिलं, 'ही कलात्मकता आहे, यात राजकारण मुळीच नाही... हेच आयुष्य....' त्याच्या याच मीममुळे महिला आयोगानेही विववेकला नोटीस पाठवली होती. किंबहुना त्याचं अशा प्रकारे ट्विट करणं खटकल्याची प्रतिक्रिया कलाविश्वातूनही अनेकांनीच दिल्याचं पाहायला मिळालं होतं.