मुंबई : निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. विवेक ओबेरॉयची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची सुरुवातीपासूनच बरीच चर्चा होती. त्यातही आता नव्याने प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमुळे पुन्हा एकदा मोदींच्या कार्याचा आढावा घेतला गेल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर असतेवेळी आणि देशाच्या पंतप्रधान पदावर आल्यावर मोदींनी नेमकी काय कामं केली, याच्यावर दृष्टीक्षेप टाकल्याचं पाहायला मिळत आहे. बनारस येथून निवडणूक लढवण्याच्या वेळी कशा प्रकारे मोदींनी स्थानिकांचा विश्वास जिंकला होता, याचंही चित्रण केलं गेल्याचं पाहायला मिळत आहे. आम्ही फक्त मेहनत करतो, जादू तर या देशाचं केंद्र सरकार करतं या वाक्याने ट्रेलरची सुरुवात होते. काही मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये विरोधकांचा मोदींना असलेला विरोध, एक चहावाला म्हणून त्यांना कमी लेखलं जाणं आणि या साऱ्यावर मात करत देशहिताखातर वाटचाल करण्यासाठी मोदींचं हट्टाला पेटण या गोष्टींची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. 



'मोदी एक व्यक्ती नव्हे विचार आहे...', असं म्हणत काँग्रेस सरकारवर टीका करणाऱ्या मोदींनी कशा प्रकारे हा देशच आपलं कुटुंब असल्याचं पटवून दिलं याचंही चित्रण केलं गेल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण देशाचं राजकीय वातावरण पाहता हा ट्रेलर चांगलाच चर्चेत आहे. निवडणुकांच्या वातावरणात या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. किंबहुना विरोधी पक्षनेते या चित्रपटाविरोधात थेट न्यायालयापर्यंत पोहोचले होते. पण, अखेर २४ मे रोजी 'पीएम नरेंद्र मोदी' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. निवडणूक निकालांच्या दुसऱ्याच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटावर निकालांचेही थेट पडसाद दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मोदींच्या या जीनप्रवासाला बॉक्स ऑफिसवर नेमका किती आणि कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.