मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री एमी जॅक्सन हिने एका मुलाला जन्म दिला. एमी आणि तिचा जोडीदार, प्रियकर जॉर्ज यांच्या आयुष्यात या छोट्या पाहुण्याच्या येण्याने ही जोडी सध्या भलतीच आनंदात आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील खास क्षण सुरुवातीपासूनच सर्वांच्या भेटीला आणले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतासुद्धा तिने अशाच काही अमुल्य क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. कुठे मुलाच्या जन्मानंतरचा एमीचा आनंदी चेहरा, तर कुठे मुलासोबत पहिल्यांदाच फेरफटका मारायला निघालेली एमी; तिची विविधं रुपं सर्वांनाच पाहायला मिळत आहेत. त्यातच भर म्हणून आता एमीने मुलाच्या पहिल्यावहिल्या फोटोशूटमधील फोटो शेअर केला आहे. 


अतिशय सुरेख आणि तितक्याच गोड फोटोला पाहून एमीच्या चाहत्यांनी तिच्या मुलालाही खुप सारं प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. 'Andreas Jax Panayiotou', असं मुलाचं नाव लिहित, 'तुमची सोमवारची सकाळ आणखी प्रकाशमान बनवण्यासाठी एक छोटीशी गोष्ट करतेय.....', असं कॅप्शन तिने या फोटोसोबत लिहिलं. तेव्हा जीवनाच्या या टप्प्यावर एका आईच्या भूमिकेत एमी खऱ्या अर्थाने रुळली आहे असं म्हणायला हरकत नाही. 



सध्याच्या घडीला खासगी आयुष्यालाच प्राधान्य देणारी ही अभिनेत्री पुढील काही दिवसांमध्ये George Panayiotou याच्याशी विवाहबंधनातही अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'बीच वेडिंग' या थीमअंतर्गत ते कायमस्वरुपी एकमेकांची साथ निभावण्याची वचनं देणार आहेत. यासाठी ग्रीस येथे त्यांच्या लग्नसोहळ्याचा थाट पाहायला मिळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तेव्हा आता खुद्द एमीच तिच्या लग्नाविषयी माहिती कधी देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.