मुंबई : 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर आता अभिनेत्री अंकिता लोखंडे हिंदी चित्रपट जगतात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटातून ती चित्रपट विश्वात आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा करत असून, यात ती झलकारी बाई ही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना रणौत या चित्रपटात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची मध्यवर्ती व्यक्तीरेखा साकारत असून, राणी लक्ष्मीबाई यांची जवळची मैत्रीण आणि रणसंग्रामात त्यांच्यासोबत वावरणाऱ्या झलकारी बाईची व्यक्तीरेखा अंकिता साकारत आहे. तिच्यासाठी हा चित्रपट म्हणजे कारकिर्दीतील अतिशय महत्त्वाची संधी आहे. 


एकिकडे अंकिता तिच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत असतानाच दुसरीकडे एका वेगळ्या कारणामुळेही ती प्रकाशझोतात आली आहे. ते कारण म्हणजे अंकिताचं खासगी आयुष्य. 


विकी जैन याच्यासोबत गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये असणारी अंकिता येत्या काळात विवाहबंधनात अडकणार असल्याचं कळत आहे. सुत्रांचा हवाला देत 'बॉम्बे टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 'सुशांत सिंह राजपूत याच्यासोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर अंकिताने विकीमध्ये तिला जोडीदार शोधला. बऱ्याच कार्यक्रमांना ते एकत्र उपस्थिती लावतात. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी सुट्टीचा आनंद घेण्यासाठीसुद्धा ते एकत्र गेले आहेत. त्या दोघांच्या मित्रमंडळींनाही त्यांच्या नात्याची कल्पना आहे.'


अंकिता आणि विकी हे एकमेकांच्या कुटुंबीयांसोबतही तितकेच मोकळेपणाने वावरततात. त्यांच्या नात्यात असणारी हीच सहजता पाहता २०१९ या वर्षात ते या नात्याला नवं वळण देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.