बॉलिवूड्च्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांची ओळख सांगण्याची वेगळी गरज नाही. 1960-70 च्या दशकात आशा पारेख सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. आशा पारेख यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज अभिनेत्यांसह काम केलं असून, अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसंच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या (CBSC) अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांनी अरबाज खानच्या 'द इनव्हिन्सिबल्स सीरीज' च्या दुसऱ्या पर्वात हजेरी लावली आहे. टीझरमध्ये आशा पारेख यांनी त्यांच्या सहकलाकारांसोबतच्या समीकरणावर भाष्य केलं. तसंच शम्मी कपूरने आपल्याशी लग्न केल्याची अफवा होती हेदेखील मान्य केलं. 


याच मुलाखतीत आशा पारेख यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतच्या नात्यावर बोलताना एक किस्सा सांगितला. एकदा शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्यावर अपमानजक टिप्पणी केली होती असा खुलासा त्यांनी केला. "मला जसं हवं आहे तसंच करू असं काहीसं ते विधान होतं. आणि मग त्यांनी प्रेसमध्ये काही विधानं दिली, जी माझ्यासाठी नव्हे तर त्याच्यासाठी अत्यंत अपमानास्पद होती".


आशा पारेख या त्यांच्या काळात निर्माते, दिग्दर्शकांकडून सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी होत्या. त्यांनी वयाच्या 10 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'कटी पतंग', 'तिसरी मंझील', 'लव्ह इन टोकियो', 'आन मिलो सजना', 'दिल देखे देखो' आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. आशा पारेख यांच्या चित्रपटांप्रमाणे खासगी आयुष्यानेही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 


आशा पारेख यांनी दिवंगत अभिनेते शमी कपूर यांच्याशी लग्न केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. पण ही अफवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आशा पारेख आयुष्यभर अविवाहित राहिल्या. आपण उपलब्ध होत नसल्याने तसंच स्वभावामुळे लोक मात्र लग्नाबद्दल विचारण्यास घाबरत होते असं त्या म्हणाल्या होत्या. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत त्यांना शमी कपूर यांच्याशी तुम्ही लग्न केलं होतं का? असं विचारलं होतं. 


त्यावर त्या म्हणाल्या होत्या की, "सुदैवाने ही अफवा लगेच बंद झाली. त्यावेळी शमी यांच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी होतं". आशा पारेख यांनी लग्न केलं नसलं तरी दिग्दर्शक, मार्गदर्शक आणि निर्माता नासिर हुसेन यांच्या प्रेमात आपण होतो अशी कबुली त्यांनी आत्मचरित्रात दिली आहे. पण आपल्याला कोणााचं घर मोडायचं नव्हतं असं त्या म्हणाल्या होत्या. 


"मी कधीच घर मोडणाऱ्यांपैकी नव्हते. माझ्यात आणि नासीर य़ांच्या कुटुंबात कधीच वाईट संबंध नव्हते. खरं तर, नुसरत (हुसैन यांची मुलगी) आणि इम्रान खान (नातू) यांना माझ्या पुस्तकाच्या लाँचच्या वेळी पाहून मला खूप आनंद झाला. मी माझे जीवन कोणाला न दुखावत चांगलं जगलं आहे," असं त्या म्हणाल्या होत्या.