मुंबई : दिवाळीच्या उत्साहपूर्ण वातावरणाला सर्वत्र सुरुवात झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या या प्रकाशमान सणाच्या निमित्ताने सर्वजण आपआपल्या परिने तयारीला लागले आहेत. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा मागे राहिलेले नाहीत. दीपिका आणि मोदींच्या नावाचा उल्लेख करण्याचं कारणंही तसंच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने 'भारत की लक्ष्मी' या उपक्रमासाठी दीपिकानेही योगदान दिलं आहे. ज्याचा व्हिडिओ खुद्द पंतप्रधानांनीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. मोदी सरकारतर्फे राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिचीसुद्धा साथ लाभली आहे. 


ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची झलकही व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एक स्त्री म्हणून मनात असणारी भीती आणि त्या भीतीवर मात करण्याची क्षमता, याच स्त्रीमध्ये असणारी जिद्द, आव्हानं पेलण्याची तिची तयारी आणि अडचणींवर टिच्चून उभं राहण्याचा आत्मविश्वास अशा अनेक गोष्टी या व्हिडिओमध्ये टीपण्यात आल्या आहेत. 



एक स्त्री ही फक्त स्त्री नसते, तर ती विविध जबाबदाऱ्यांचं आदर्श उदाहरण असते. याचीच जाणीव हा व्हिडिओ पाहताना होत आहे. महिला सबलीकरणाच्या याच मुद्द्याला अधोरेखित करत अशाच काही जिद्दी महिलांची कहाणी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. एका प्रशंसनीय मोहिमेसाठी दीपिकाचं हे योगदान सध्या अनेकांची मनं जिकंत आहे, सोबतच ही मोहिमही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.