मुंबई: जीवन म्हणजे एक प्रकारचा वळणावळणांचा खडतर रस्ताच आहे. या वाटेत जितकी वळणं आहेत तितकेच खाचखळगेही आहेत. आता ते तुम्ही कसे पार करता यातच खरं कौशल्य दडलेलं आहे. मुळात ही वाट चालताना अनेकजण अगदी सहजपणे ती पार करतात. पण, काहींच्या वाट्याला येणारी वळणं ही इतकी खडतर असतात, ज्याच्यापुढे मग आपल्याला नमतं घ्यावं लागतं. या सर्व परिस्थितीकडे नैराश्याच्या नजरेतून पाहिलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री दीपिका पदुकोणने अशाच परिस्थितीचा सामना केला होता. २०१४ मध्ये तिच्यावर क्लिनिकल डिप्रेशनचे उपचार करण्यात आले होते. खुद्द दीपिकाने याचा खुलासा बऱ्याच कार्यक्रमांमध्ये केला आहे. 


सध्या एका व्हिडिओच्या माध्यमातून तिने नैराश्यग्रस्त अवस्थेतील काही आठवणी जागवल्या. ज्यामुळे तिला रडू कोसळलं.


तरीही दीपिकाने त्याविषयी खुलेपणाने बोलण्याला प्राधान्य दिलं. 



ज्या गोष्टीमुळे आपल्याला नैराश्य आलं आहे ती इतरांना सांगितल्यानंतर समोरची व्यक्ती ते समजू शकेल का, हाच प्रश्न तिला पडत होता. नेमकं काय होतंय याची कल्पना तिला होती. पण, ते इतरांना कसं सांगायचं याचा मार्ग मात्र तिला सापडत नव्हता', असं ती म्हणाली. 


अतिशय बिकट अशा या परिस्थितीवर वारंवार झोपणं हा एकच उपाय तिला दिसत होता. ही एक पळवाट होती, असं स्वत: दीपिकाच या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. 


अनेकदा मनात नसतानाही भावनांचा सामना करत इतरांसमोर चेहऱ्यावर हास्य ठेवण्यात मी भाग होते. कधी कधी तर ढसाढसा रडावंसं वाटायचं पण, इतर सर्व काय विचार करतील, या एकाच विचाराने मी तसंही करु शकत नव्हते, असंही ती म्हणाली. 


कारकिर्दीत महत्त्वाच्या टप्प्यावर आल्यानंतर दीपिकाच्या वाट्याला या अडचणी आल्या होत्या, जेथे तिने आत्मविश्वास गमावला होता. पण तरीही मोठ्या धाडसाने तिने यावरही मात करत पुन्हा एकदा आयुष्य पूर्वपदावर आणत अनेकांनाच प्रेरणा दिली.