PHOTO : दीपिका- रणवीरमध्ये `तिचं` येणं म्हणजे....
आता ही नवी `ती` कोण?
मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही नावं घेतली की डोळ्यांसमोर उभी राहते ती म्हणजे बी- टाऊनची सर्वात लाडकी आणि अर्थातच सर्वांना प्रेमाची शिकवण देणारी जोडी. चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या दीपिका आणि रणवीरने त्यांच्या नात्याला काही महिन्यांपूर्वीच एक नवं नाव दिलं. लग्नबंधनात अडकत त्यांनी प्रेमाचं हे नातं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. अशा या सर्वांच्याच आवडीच्या जोडीमध्ये आता 'तिची'ही एन्ट्री झाली आहे. 'ती....' आता ही नवी 'ती' कोण? असाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना?
अर्थात ही 'ती' काही नवी नाही. अगदी कुणासाठीच नाही. कारण ती आहे, दीपिकाची बहीण अनिशा पदुकोण. खुद्द दीपिकानेच सोशल मीडियावर अनिशा आणि रवीरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एकाच फ्रेममध्ये हे तिघंही ज्या पद्धतीने मावले आहेत ते पाहता अनोखा फॅमिली फोटोच सर्वांना पाहायला मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही.
“cuddles & snuggles! smashed in the middle! @ranveersingh @anishapaduon”, असं कॅप्शन लिहित दीपिकाने हा फोटो पोस्ट केला. ज्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनीही बऱ्याच कमेंट केल्याचं पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला दीपिका आणि रणवीर हे दोघंही त्यांच्या आगामी चित्रपटांच्या तयारीत व्यग्र आहेत. पण, तरीही मित्रपरिवार असो किंवा कुटुंबातील एखादा सदस्य. प्रत्येकालाच पुरेसा वेळ देत ही जोडी त्यांची जबाबदारीही पार पाडत सर्वांचीच मनं राखत असल्याचं कळत आहे. त्यामुळे फक्त रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही सुपरहिट आहे हे खरं.
दीपिका आणि रणवीरच्या आगामी चित्रपटांविषयी म्हणावं तर, येत्या काळात रणवीर हा कबीर खान दिग्दर्शित '८३' या चित्रपटातून झळकणार आहे. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाच्या १९८३ मधील क्रिकेट विश्वचषक विजयाची गाथा पुन्हा जागवणार आहे. तर, दीपिका येत्या काळात 'छपाक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये ऍसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.