VIDEO : अशी साकारली सुवर्णझळाळी असणाऱी दीपिकाची `ही` साडी
१६ हजार तास, अद्वितीय कलेचा नमुना आणि...
मुंबई : 'हम जीते है एक बार, मरते है एक बार और शादी भी करते है एकबार....' असं म्हणत दणक्यात लग्न करणाऱ्यांची संख्या मोजण्याच्याही पलीकडे आहे. हिंदी कलाविश्वात सध्याच्या घडीला अशाच एका जोडीच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. त्या जोडीची नव्याने ओळख करुन देण्याची गरज नाही, हेसुद्धा तितकच खरं. ती जोडी आहे, अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची.
रणवीर आणि दीपिकाने मोठ्या थाटामाटात इटलीतील लेक कोमो येथे लग्न केलं. या जोडीच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक क्षण हा एखाद्या सुरेख अशा चित्रापमाणेच वाटत होता. मग ती त्यांची मेहंदी असो, किंवा लग्नसोहळ्यातील विधी असो.
एकंदरच विधींपासून ते अगदी स्वागत सोहळ्यांपर्यंत दीप-वीरच्या लूकचीही प्रचंड चर्चा झाली. त्यामागचं एक मुख्य कारण ठरलं ते म्हणजे या दोघांचे डोळे दिपवणारे लूक.
साडीपासून गाऊनपर्यंत प्रत्येक वेळी दीपिका आणि रणवीर अगदी सहजपणे सर्वांसमोर आले. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने त्यांच्या विवाहसोहळ्यातील बऱ्याच कपड्यांचं डिझाईन केलं होतं. पण, सब्यसाचीसोबतच 'दीप-वीर'ने आणखी एका सेलिब्रिटी डिझायनर जोडीलाही पसंती दिली.
संदीप खोसला आणि अबू जानी यांनी दीपिकाच्या पांढऱ्या साडीतील महाराणी लूक डिझाईन केला होता. चिकनकारी आणि सोनेरी जरीकाम यांची सुरेख सांगड घालण्याच आलेला हा लूक, ही साडी आणि लक्षवेधी ओढणी साकारण्यासाठी तब्बल १६ हजार तास लागले.
अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयीचा एक व्हि़डिओ पोस्ट करण्यात आला आहे. जरदोसी लेसची किनार असणारी देमी साडी आणि ओढणी, रेशम आणि क्रिस्टल यांची सांगड घालून तयार केलेली चोळी आणि चिकनकारीच्या कलेची झलक असणारा दीपिकाचा हा एकंदर लूक सोशल मीडियावरही अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेला असं म्हणायला हरकत नाही.