`हिरामंडीच्या सेटवर मी दारु पिऊन...`, रिचा चढ्ढाने पहिल्यांदाच केला खुलासा, `माझा सर्वात वाईट दिवस`
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या `हिरामंडी` वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमधील एका सीनसाठी रिचा चढ्ढाने एकूण 99 रिटेक दिल्याचा खुलासा केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने नुकतीच 'नेटफ्लिक्स'वरील कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी रिचा चढ्ढासह हिरामंडी वेब सीरिजमधील सर्व कलाकार उपस्थित होते. दरम्यान यावेळी रिचा चढ्ढाने आपण वेब सीरिजमधील एका डान्स सिक्वेन्ससाठी एक, दोन नव्हे तर तब्बल 99 रिटेक दिल्याचा खुलासा केला आहे. नेटफ्लिक्सने रिचा चढ्ढाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टला त्यांनी सर्वाधिक स्कोअर अशी कॅप्शन दिली आहे.
व्हिडीओत हिरामंडीमधील सर्व अभिनेते सर्वाधिक रिटेक कोणी दिले याची तुलना करत होते. यावेळी सोनाक्षी सिन्हा आणि आदिती राव हैदरी यांनी आपण 12 ते 13 पेक्षा जास्त रिटेक दिले नसल्याचं सांगितलं. यादरम्यान रिचा चढ्ढाने आपण एका सीनसाठी तब्बल 99 रिटेक दिल्याचा खुलासा केला.
रिचा चढ्ढाने सांगितलं की, "जो माझा सर्वात चांगला दिवस होता, तोच सर्वात वाईटही होता. माझा सर्वात वाईट दिवस शूटवेळी सर्वात चांगला दिवस ठरला. डान्स सिक्वेन्स शूट करताना सर्वाधिक रिटेक देणाऱ्यांमध्ये मी प्रथम आहे. मी शतक ठोकता ठोकता हुकली आहे. 200 ते 300 एक्स्ट्रा जेव्हा तुमच्याकजे पाहत असतात आणि तुम्ही चुकत असता तेव्हा ते सोपं नसतं. पण जेव्हा तुम्ही त्यावर मात करता तेव्हा ती भावना फार सुखावणारी असतो. वा, मी हे करु शकते हे मला माहितीच नसतं असा तो क्षण असतो आणि ती भावना फार छान असते".
नेटफ्लिक्सने सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "रिचा खरंच म्हणाली की, माझ्या 99 समस्या आहेत आणि त्या सर्व रिटेक आहेत". हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर चाहते त्यावर कमेंट्स करत आहेत. अनेकांनी रिचा चढ्ढाच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं आहे की, "रिचा चढ्ढाने फार सुंदर डान्स केला आहे. तिला इतकं सुंदर डान्स करताना पाहून मलाही आश्चर्य वाटलं. ती इतका चांगला डान्स करु शकते हे मला माहिती नव्हतं. ती एक क्लासिकल डान्सर आहे याची कल्पना नव्वहती". दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, हा एकमेव डान्स सिक्वेन्स आहे जो मी फास्ट फॉरवर्डमध्ये पाहिला नाही.
दारुही प्यायली
झूमला दिलेल्या मुलाखतीत रिचाने आपण या डान्सच्या शूटसाठी मद्यप्राशन केल्याचा खुलासाही केला होता. 'मी सीनमध्ये दारुच्या नशेत दिलायला हवं होतं. 30 ते 40 टेकनंतर मी एक क्वार्टर घेऊन काय होतंय हे पाहूया असा विचार केला. मी थोडीशी प्यायले. पण यामुळे गोष्टी अजून बिघडल्या. मला शरिरात फार आळशीपणा नको होतो. मला ग्रेस घालवायची नव्हती,' अस रिचाने सांगितलं होतं. मद्यप्राशन केल्यानंतर आपण फक्त अभिनय केलेला बरा हे लक्षात आलं असंही तिने सांगितलं.
रिचा चढ्ढासह हिरामंडीमध्ये सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, शर्मीन सेगल, संजीदा शेख, फरदीन खान, शेखर सुमन, अध्यायन सुमन आणि ताहा शाह हेदेखील प्रमुख भूमिकेत आहेत.