मुंबई: 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है', 'माय नेम इज खान' अशा चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. अभिनय विश्वात आपल्या अनोख्या शैलीने रुपेरी पडद्यावर चर्चेत असणाऱ्या काजोलला सुरुवातीला अभिनय विश्वात यायचं नव्हतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द काजोलनेच 'टेक 2 विथ अनुपमा अँड राजीव' या कार्यक्रमात याविषयीचा खुलासा केला. 


'खरंतर मी अभिनेत्री होऊ इच्छित नव्हते. अभिनयासाठी देण्यात येणारं मानधन मला नेहमीच कमी वाटायचं. माझ्यामते मेहनत पाहता त्याला मिळणारं मानधन हे कमीच होतं. माझी आई जे काम करायची त्यासाठी ती फार जास्त मेहनत घेत आहे, असंच मला वाटायचं', असं काजोलने स्पष्ट केलं. 


किंबहुना काजोलने तिच्या आईलाही याविषयी कल्पना दिली होती. 


आपण अशा क्षेत्रात काम करु इच्छितो ज्यामध्ये करण्यात येणाऱ्या मेहनतीसाठी योग्य ते मानधन देण्यात येईल याच निर्णयावर ती ठाम होती. 


अभिनय विश्वाकडे पाहण्याच्या वेगळ्या दृष्टीकोनामुळे काजोलच्या मनात काही वेगळ्या संकल्पनांनी घर केलं होतं. पण, त्यानंतरच्या काळात मात्र बऱ्याच गोष्टी बदलल्या. 


पाहता पाहता काजोलने या क्षेत्रात करिअरच्या वाटा निवडल्या आणि कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. 


सध्याच्या घडीला ती 'हॅलिकॉप्टर ई'ला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, १२ ऑक्टोबरला तिचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.