मुंबई : 'देव डी', 'ये जवानी है दिवानी', 'झिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री कल्की कोचलीन ही नेहमीच प्रकाशझोतात असते. विविध धाटणीच्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिकांची निवड करत त्याच ताकदीने त्या साकारण्याची किमया कल्की करते, त्यात यशस्वीही ठरते. प्रेक्षकांची दाद मिळवत आणि सहाय्यक भूमिकांपासून सुरुवात करत प्रसिद्धी मिळवलेली ही अभिनेत्री मुख्य भूमिकांमध्ये स्वत:ला सिद्ध करते. पण, हे यश आणि प्रसिद्धी तिच्या वाट्याला इतक्या सहजासहजी आलेली नाही. 'ह्युमन्स ऑफ बॉम्बेला' दिलेल्या मुलाखतीत तिनेच याविषयीची माहिती देत आपल्या खासगी आयुष्याविषयीची काही गोष्टी उघड केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्सवरुन वडील भारतात येण्याच्याच सुमारास कल्कीच्या वडिलांची तिच्या आईशी भेट झाली. पुढे दोघांनी एकत्र येत कौटुंबीक आयुष्याला प्राधान्य दिलं. मुंबईत हळूहळू ते स्थिरावले. बालपणी आपण वेगळे, किंबहुना परदेशी नागरिकांप्रमाणे गोऱ्या वर्णाचे आहोत हे तिच्या लक्षातही आलं नव्हतं. पण, मोठं झाल्यावर आपण 'बाहेरचे' असल्याची जाणिव तिला काही प्रसंगांतून झाली. ज्यामध्ये कल्की समुद्रकिनारी कधी तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी गेली असता अमली पदार्थांसाठी लोक तिच्याकडे विचारणा करायचे. हे कल्कीसाठी काहीसं अनपेक्षित होतं. 


कालांतराने ती जसजशी मोठी झाली तेव्हा अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच्या निमित्ताने ती परदेशात गेली. तिने शिक्षण सांभाळून वेटरची नोकरीही केली. कल्की अनेकदा स्वत:च्या भूमिका, लहान एकपात्री नाटकं स्वत:च लिहायची. पाहता पाहता तिने चित्रपटांसाठी ऑडिशन्स देण्यास सुरुवात केली. पण, हा संघर्ष सोपा आणि कधीही न संपणाराच होता. जवळपास दोन वर्षे तिच्याकडे या कलाविश्वात काहीच काम नव्हतं. पण, तरीही तिने जिद्द सोडली नाही. अखेर २०११ या वर्षात तिचे एकूण चार चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होते.



कलाविश्वात यशाचा एक-एक टप्पा सर करणाऱ्या कल्कीने तिच्या खासगी आयुष्याविषयीही खुलासा केला. पूर्वाश्रमीच्या पतीसोबत (दिग्दर्शक अनुराग कश्यप) घटस्फोट घेतल्यानंतर तिला अशाच काही गोष्टींचा सामना करावा लागला. कोणत्याही पुरुषासोबत मी दिसल्यावर माध्यमामध्ये आम्ही डेट करत असल्याच्या चर्चा होत. मला अनेक अफवांचाही सामना करावा लागला. घटस्फोटानंतरच्या आयुष्यावर प्रश्न उपस्थित केले जायचे. करिअर आणि खासगी आयुष्यात समतोल कसा राखते यावियी विचारलं जायचं. किंबहुना काही शेजाऱ्यांनीही माझ्या पालकांना माझ्याविषयी असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती', असं कल्की म्हणाली. या परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्याची एकच भूमिका ठेवत तिने अडचणींवर मात केली. संघर्ष कोणालाही चुकलेला नाही, पण त्याने खचून न जाता आयुष्य जगत राहिलं पाहिजे हाच संदेश तिने आपल्या या प्रवासातून आणि अनुभवांतून दिला आहे.