#Cannes2019 : `कान`साठी काहीपण म्हणत, अखेर कंगनाने करुन दाखवलं
कलाविश्वात काही कार्यक्रम आणि सोहळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व असतं.
मुंबई : कलाविश्वात काही कार्यक्रम आणि सोहळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व असतं. देशोदेशीच्या लोकप्रिय सेलिब्रिटींची उपस्थिती, त्यात होणाऱ्या चर्चा, बदलणारे फॅशनचे ट्रेंड अशा अनेक गोष्टी अशा सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतात. असाच एक बहुचर्चित सोहळा म्हणजे कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. कानच्या रेड कार्पेटवर साऱ्या विश्वातील काही लोकप्रिय कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळते. भारतीय कलाविश्वाशीही कान अतिशय सुरेखपणे जोडलं गेलं आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बी टाऊन सेलिब्रिटी या सोहळ्याला हजेरी लावणार असून, या सोहळ्यातील परफेक्ट लूकसाठी त्यांनी तयारी सुरु करत अनेकांना थक्क केलं आहे. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे कंगना रानौत. कंगनाने 'कान'च्या रेड कार्पेटवर जाण्यापूर्वी एका परफेक्ट लूकसाठी अवघ्या दहा दिवसांमध्ये जवळपास पाच किलो वजन घटवलं आहे.
झालात ना तुम्हीही थक्क? 'टीम कंगना रानौत' या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनच याविषयीची माहिती आणि कंगनाचे काही फोटो पोस्ट करण्यात आले. ज्यामध्ये खरंच कंगनामधील फरक स्पष्टपणे कळत आहे.
चित्रपटाच्या चित्रीकरणांमध्ये व्यग्र असणारी कंगना नेहमीच व्यायाम आणि शारीरिक सुदृढतेला महत्त्व देते. कंगनात झालेला हा बदल पाहता आता 'कान'च्या रेड कार्पेटवर नेमकी कोणत्या रुपात सर्वांसमोर येणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. एकिकडे 'कान'च्या रंगतदार सोहळ्याला सुरुवात झालेली असतानाच दुसरीकडे कंगना तिच्या आगामी चित्रपटांवरही लक्ष केंद्रीत करत आहे. एकता कपूरच्या 'मेंटल है क्या' या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, अश्विनी अय्यरच्या 'पंगा'तूनही ती झळकणार आहे.