मातृत्त्वासाठी १४ वेळा प्रयत्न करुनही अभिनेत्री अपयशी; अखेर घेतला IVF चा आधार
लिव्ह इनपासूनचं नातं असो किंवा मग वैवाहिक आयुष्य...
मुंबई : मागील काही दिवसांपासून विनोदवीर कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी अभिनेत्री kashmera shah कश्मीरा शाह बऱ्याच चर्चांमध्ये आहेत. बहुविध कारणांनी या चर्चा सुरु आहेत. एक यशस्वी सेलिब्रिटी कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. त्यांचं प्रेम असो, लिव्ह इनपासूनचं नातं असो किंवा मग वैवाहिक आयुष्य. प्रत्येक टप्प्यावर कश्मीरा आणि कृष्णानं एकमेकांना साथ दिली.
सध्या त्यांचं कुटुंब परिपूर्ण झालं आहे. पण, इथवर पोहोचण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. हा सामना होता त्यांच्या पालकत्त्वासाठीचा. 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत कश्मीरानं तिच्या याच प्रवासाचा उलगडा केला होता. ज्यामध्ये आपण जवळपास तीन वर्षे गरोदर राहण्यासाठी प्रयत्न करुनही यात असफल झाल्याचं ती म्हणाली होती.
आपल्या जुळ्या मुलांचा जन्म हा नैसर्गिकपणे गरोदर राहून झाला नसल्याचं सांगत यादरम्यानच्या काळात आपल्या आरोग्यावरही याचे परिणाम झाले होते असं तिनं सांगितलेलं. आयवीएफ IVF च्या प्रक्रियेदरम्यान शरीरात फार मोठे बदल झाले, हेसुद्धा तिनं सांगितलं होतं.
'मुलं होण्यासाठी मी 14 वेळा प्रयत्न केला. मुळात आयवीएफची इंजेक्शन ही एखाद्या महिलेल्या प्रसूतीच्या वेळी काय वाटत असेल याच भावनेची जाणीव देतात. तुमच्या मनस्थितीत बदल होतो. तुमचं वजन वाढतं, अनेकदा चिडचीड होते. पुढं हे वाढलेलं वजन कमी करणंही कठीण होऊन बसतं. कारण, ही नैसर्गिक प्रक्रिया नसते', असं ती म्हणाली.
अनेकांनी कश्मीराच्या सरोगसीच्या निर्णयावरही टीका केली होती. कित्येकांच्या मते सुडौल बांधा गमावू नये यासाठीच तिनं सरोगसीचा मार्ग निवडल्याचंही म्हटलं गेलं. पण, मुळात तसं नसल्याचं सांगत आयवीएफ प्रक्रियेदरम्यान घेत असणाऱ्या इंजेक्शनमुळं आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर याचे परिणामही होत असल्याचं स्पष्टीकरण तिनं दिलं.
आव्हानं खूप होती, पण कश्मीरानं आरोग्य आणि मातृत्त्वाच्या वाटेत आलेल्या कोणत्याच आव्हानापुढं हात टेकले नाहीत. ज्यांना वेळेत मुलं झाली अशा अनेकांनीच आपल्याबाबत चुकीची वक्तव्य केली असं म्हणत आपल्या जीवनात अगदी जोडीदार भेटण्यापासून ते त्याला पालकत्त्वासाठी तयार करेपर्यंत सारंकाही उशीराच झाल्याचं म्हणत तिनं वस्तूस्थिती समोठ ठेवली होती. आव्हानं पार करत, काहींचा रोष पत्करत आणि त्यातूनही जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवत कश्मीरानं अतिशय सुरेखपणे जुळ्या मुलांचं मातृत्वं स्वीकारलं.