मुंबई : अभिनेत्री मनिषा कोईराला हिने 'संजू' या चित्रपटात साकारलेली अभिनेत्री नर्गिस यांची भूमिका बरीच गाजली, चर्चेचा विषय ठरली. ही भूमिका गाजण्याचं कारणंही तसंच होतं. बराच काळ कलाविश्वापासून दूर राहिल्यानंतर आणि कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज दिल्यांनंतर ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्याचा ठाव घेत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्करोगाचं निदान झाल्यापासून ते या आजावर मात करण्य़ापर्यंत प्रत्येक वेळी मनिषाने तिच्या जीवनात मिळालेल्या प्रत्येक संधीचे आभार मानले आहेत. याचीच प्रचिती तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमधून येत आहे. मनिषाने सोशल मीडियावर तिच्या दोन फोटोंचं एक कोलाज शेअर केलं आहे. ज्यामधील एका फोटोत ती, रुग्णालयात दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये ती बर्फाच्छादित डोंगरांमध्ये उभी असल्याचं दिसत आहे. 


मनिषाने शेअर केलेले दोन्ही फोटो बरंच काही सांगून जात आहेत. यातील एका फोटोमध्ये ती कर्करोगाशी धीराने झुंजताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती आयुष्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. सध्याच्या घडीला कर्करोगाला यशस्वीपणे तोंड देणारी ही अभिनेत्री अनेकांनाच या आजाराशी लढण्याची प्रेरणा देत आहे. 




मुळात मनिषाने कर्करोगाकडे कधीच गंभीर आजार म्हणून पाहिलं नाही. काही मुलाखतींमध्ये याविषयी व्यक्त होताना, तिने कर्करोगाला एक अशी भेट म्हटलं आहे, ज्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन आणखी स्वच्छ आणि तितकाच स्पष्ट झाल्याचं ती न विसरता सांगते. राग, मत्सर, चिडचीड अशा अनेक भावना शांततापूर्ण पद्धतीने कशा व्यक्त करता येतील हेसुद्धा तिला या आजाराशी लढा देतानाच उमगलं. सकारात्मक दृष्टीकोन आणि जिद्दीच्या बळावर मनिषापुढे खऱ्या अर्थाने कर्करोगानेही हार मानली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.