मुंबई : काही चौकटीबाहेरच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाच्या बळावर नवी ओळख प्रस्थापित करणारील एक अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. आतापर्यंतच्या कारकिर्दीत विविध भूमिकांना न्याय देणाऱ्या नीना गुप्ता यांनी एक अभिनेत्री म्हणून त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला होता, याविषयी वक्तव्य केलं. शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'समाजात निर्माण झालेल्या माझ्या प्रतिमेमुळे एक अभिनेत्री म्हणून मला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे चित्रपटांमध्ये भूमिका मिळवण्यासाठी समाजात चांगलं स्थान अबाधित राखणं तितकच महत्त्वाचं आहे', असं त्या म्हणाल्या. आजही समाजाच्या दृष्टीकोनात फार बदल झाले नसल्याची बाब अधोरेखित करत त्यांनी होतकरू आणि नवोदित अभिनेत्रींना एक सल्ला दिला. कामाच्या ठिकाणी गरजेहून जास्त मैत्रीपूर्ण संबंधांची ठेवण्याची गरज नसल्याचं म्हणत याचा फटका आपल्याला बसला होता हे स्पष्ट केलं. 


१९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गांधी' या चित्रपटातून गुप्ता यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली होती. ज्यानंतर 'जाने भी दो यारो', 'खलनायक', 'मंडी' आणि अशा अनेक चित्रपटांतून त्यांच्या अभिनयाची झलक पाहता आली. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'बधाई हो' या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. त्यांच्या खासगी आयुष्यानेही नेहमीच सर्वाचं लक्ष वेधलं. वेस्ट इंडिज संघातील विश्वविख्यात माजी खेळाडू विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्या नात्याने बऱ्याच गोष्टींना शह दिला. मसाबा ही त्यांची मुलगी सध्या एक प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे. पण, विवाहबंधनात अडकल्याशिवाय मुलीला जन्म दिल्यामुळेही त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला होता. 


'एकल मातृत्वाची जबाबदारी घेतल्यामुळे अनेकांच्या नजरेत मी धाडसी, खंबीर महिला होते आणि मी तशी आहेसुद्धा. पण, त्या काळात मात्र अशा महिलांच्या वाट्याला नकारात्मक भूमिकाच येत होत्या. त्यामुळे मीसुद्धात्यावेळी चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकाच साकारल्या, ही वस्तूस्थिती त्यांनी मांडली. 


धुम्रपान करायचं असेल तर ते सर्वांसमोर करु नका, सर्वासमोर कोणाशीच जवळीक साधू नका कारण ही सगळी धाडसी, खंबीर आणि स्वतंत्र महिलेची चिन्हं आहेत, ज्यामुळे तुम्हाला काही ठराविक भूमिकांसाठीच निवडलं जाऊ शकतं, असं सूचक विधान त्यांनी नव्या अभिनेत्रींना उद्देशून केलं.