प्रियांकाला अचानक का आठवले अक्षय कुमार आणि सलमान खान? 20 वर्षांनंतर शेअर केला फोटो
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर अक्षय कुमार आणि सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 20 वर्षांनंतर प्रियांकाला अचानक दोघांची आठवण का आली. जाणून घ्या सविस्तर
Priyanka Chopra Insta Post: अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर तिने हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केलं आहे. 2017 मध्ये प्रियांकाने ड्वेन जॉन्सनच्या बेवॉच या चित्रपटाद्वारे तिच्या हॉलीवूड प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर 'क्वांटिको' या वेब सीरिजमधून प्रियांका मुख्य भूमिका साकारून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाली. आता प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर अक्षय कुमार आणि सलमान खानचे फोटो शेअर केले आहेत.
प्रियांकाच्या पोस्टमध्ये काय?
2004 मध्ये 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात प्रियांका चोप्राने काम केले होते. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता सलमान खान देखील होते. मुझसे शादी करोगी हा चित्रपट 30 जुलै 2004 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. आज या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. 20 वर्षांनंतर प्रियांका चोप्राने चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये तिच्या एका बाजूला सलमान खान आणि दुसऱ्या बाजूला अक्षय कुमार उभा असलेला दिसत आहे.
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने फोटोसोबत 'राणी बनण्याची 20 वर्षे' असं खास कॅप्शन देखील दिलं आहे. 20 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. हा चित्रपट प्रेक्षकांना देखील खूप आवडला होता.
चित्रपटच नाहीतर गाणीही सुपरहिट
अक्षय कुमार, सलमान खान आणि प्रियांका चोप्रा यांचा 'मुझसे शादी करोगी' हा चित्रपट 19 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, रोमँटिक आणि तुफान कॉमेडी चित्रपट असल्यामुळे तो प्रेक्षकांना खूप आवडला. याचा परिणाम असा झाला की या चित्रपटाने जगभरात 55.97 कोटींची कमाई केली. अक्षय, प्रियांका आणि सलमानचा हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अमरीश पुरी, राजपाल यादव, काजर खान, सतीश शाह यांचा देखील समावेश होता. हा चित्रपट केवळ यशस्वीच झाला नाही तर त्यातील गाणीही सुपरहिट झाली आहेत.