प्रियांका भारताची पंतप्रधान झाली, तर निकवर सोपवणार `ही` जबाबदारी
ऐकताय ना?
मुंबई : भारतीय कलाविश्वात प्रसिद्धी आणि यश मिळवल्यानंतर अभिनेत्री प्रियांचा चोप्रा हिने आंतरराष्ट्रीय कलाविश्वाकडे तिता मोर्चा वळवला. साऱ्या विश्वातील प्रेक्षकांमध्ये प्रियांकाची लोकप्रिया फार कमी काळातच वाढू लागली. फक्त अभिनयच नव्हे, तर गायन, चित्रपट निर्मिती, मॉडेलिंग अशा विविधक्षेत्रांमध्ये तिने उल्लेखनीय कामगिरी केली. समाजभान जपत तिने युनिसेफचं सदिच्छादूत हे पदही भूषवलं. ज्यानंतर आता ही 'देसी गर्ल' आणखी एका नव्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज असल्याचं कलत आहे. किंबहुना खुद्द प्रियांकानेच याविषयीचं वक्तव्य केलं.
'पीपल्स डॉट कॉम'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार येत्या काळात भारताच्या पंतप्रधानपदासाठीच्या शर्यतीत उतरण्याची इच्छा तिने एका मुलाखतीत व्यक्त केली. या मुलाखतीत तिने स्वत:चे आणि पती निक जोनासचे राजकीय विचार आणि काही इच्छा मांडल्या.
'मी भारताच्या पंतप्रधानपदासाठीच्या शर्यतीत सहभागी होऊ इच्छिते. निकनेही राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सहभागी व्हावं, असं मला वाटतं', असं प्रियांका म्हणाली. राजकारणाशी जोडल्या गेलेल्या गोष्टी आपल्या पसंतीस उतरत नाहीत, असं म्हणणाऱ्या प्रियांकाने निक आणि तिला काही बाबतीत महत्त्वपूर्ण बदल हवे असल्य़ाची बाब अधोरेखित करत हे आपण कधीच नाकारलं नसल्याचंही ती म्हणाली.
आपण सहसा अराजकीय राहण्यालाच प्राधान्य देत असल्याचं म्हणत, मी माणुसकीला दाद देते असं यामागचं कारण तिने स्पष्ट केलं. निक एक चांगला नेता होऊ शकेल याची हमीही तिने या मुलाखतीत दिली. शिवाय तो स्वत: स्त्रीवादाचा ज्या पद्धतीने उल्लेख करतो त्याचीही तिने प्रशंसा केली. प्रियांका आणि निक ही सेलिब्रिटी जोडी आंतरराष्ट्रीय कलाविश्वात सुरुवातीपासूनच अनेकांचं लक्ष वेधत आहे. एखादा पुरस्कार सोहळा म्हणू नका किंवा मग कुटुंबातील एखादा समारंभ प्रियांका निकवरच साऱ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात.