फेमिनिझम म्हणजे नेमकं काय, सांगतेय ‘ही’ अभिनेत्री
फेमिनिझम म्हणजे....
मुंबई: विविध आव्हानात्मक भूमिकांना न्याय देत तितक्याच ताकदीने त्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री राधिका आपटे हीने एका महत्त्वाच्या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राधिकाने नेहमीच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आहे. सध्या ती चर्चेत आहे ते म्हणजे फेमिनिझमविषयीच्या तिच्या एका वक्तव्यामुळे.
‘ही गोष्ट लक्षात घेणं अतिशय महत्त्वाची आहे की, ज्यावेळी एखादी महिला आपण फेमिनिस्ट (स्त्रीवादी) असल्याचं म्हणते त्यावेळी तिला पुरुषांप्रमाणेच समान हक्क मिळणं अपेक्षित असतं. पुरुषांना पिछाडीवर टाकण्याचा मनसुबा त्यामागे कधीच नसतो’, असं तिने स्पष्ट केलं.
गेल्या काही काळापासून राधिका आपटेची कलाविश्वातील कामगिरी पाहता विक्रमादित्य मोटवाने याने तिला ‘2018 ची राजकुमार राव’ म्हटलं होतं.
याविषयीच जेव्हा तिला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याचं उत्तर देत तिने विक्रमादित्यची ही प्रतिक्रिया आपल्यासाठी शाबासकीची थाप असल्याचंच म्हटलं.
राजकुमार राव हा आपलाही आवडता अभिनेता असून, त्याच्यासोबत येत्या काळात काम करण्याची इच्छा असल्याचंही तिने स्पष्ट केलं. त्यामुळे आता येत्या काळात राधिका आणि राजकुमार रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राधिका ही विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करत असली तरीही सर्वच मुद्द्यांवर आपण भूमिका मांडतोच असं नाही, हा मुद्दाही तिने मांडला.
राधिका सध्या वेब सीरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. येत्या काळात ती ‘बाझार’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.