Happy B`Day : रेखा यांच्या खऱ्या नावापासून ते प्रेमप्रकरणांपर्यंत...
हा आहे काही रंजक गोष्टींचा `सिलसिला`...
मुंबई : चिरतरुण सौंदर्य म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न कोणाच्या मनात घर करत असेल तर त्यांना या प्रश्नाचं उत्तर एका अभिनेत्रीचा चेहरा पाहूनच मिळेल. तिच्या नजरेचा एकच कटाक्ष या प्रश्नाचं उत्तर देऊन जातो. तो चेहरा.... ती अभिनेत्री म्हणजे 'रेखा'.
आणखी एका वर्षाने वयाचा आकडा ओलांडणाऱ्या रेखा यांचा उल्लेख करताना प्रेक्षकांना एक वेगळाच आपलेपणा वाटतो. कोणासाठी हा आपलेपणा रेखा यांच्या सौंदर्यामुळे आहे, कोणासाठी तो त्यांच्या चित्रपटांमुळे आहे. तर, कोणासाठी फक्त रेखा यांच्यातील एका व्यक्तीमुळे आहे.
रुपेरी पडदा आणि साऱ्या कलाविश्वात वावरणाऱ्या रेखा यांच्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याचदा बोललं, लिहिलं गेलं. मुळात लिहिण्या-बोलण्यासारखं खुप काही आहे हेसुद्धा नाकारता येणार नाही. चला तर मग, पुन्हा एकदा नजर टाकूया आरस्पानी सौंदर्याच्या रेखा यांच्याविषयीच्या काही रंजक गोष्टींवर...
*रेखा या नावाने त्या ओळखल्या जात असल्या तरीही त्यांचं खरं नाव आहे भानुप्रिया गणेशन. तामिळ सुपरस्टार जेमिनी गणेशन आणि तेलुगू अभिनेत्री पुष्पावल्ली यांची ही कन्या.
*'सावन भादों' या चित्रपटातून रातोरात प्रसिद्धीझोतात येणाऱ्या रेखा पुढे त्यांच्या मादक सौंदर्यासाठी ओळखल्या जाऊ लागल्या.
*'उमराव जान' या चित्रपटातून झलकणाऱ्या रेखा यांच्या वाट्याला याच चित्रपटामुळे राष्ट्रीय पुरस्कारही आला.
*जवळपास दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये झळकणाऱ्या रेखा यांची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या मनात अगदी कमी वेळातच घर करत होती. फक्त हिंदीच नव्हे, तर बी आणि सी ग्रेड तेलुगू चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं होतं.
*काही मोजक्याच कलाकार मंडळींमध्ये वावरणाऱ्या रेखा सहसा बॉलिवूड पार्टीला किंवा इतर समारंभांना हजेरी लावत नाहीत. पुरस्कार सोहळ्यांमध्ये मात्र त्यांचा वावर सर्वांचं लक्ष वेधून जातो.
*प्रसिद्ध चित्रपट समीक्षक ओमर कुरेशी यांच्या म्हणण्यानुसार दिवा 'Diva' हा सब्दच जणू रेखा यांच्यासाठीच पुढे आला आहे. स्वत:मध्ये कमालीचे बदल घडवून आणणाऱ्या रेखा यांनी एक अभिनेत्री म्हणून कायमच प्रत्येक बदल स्वीकारत त्या अनुशंगाने स्वत:ला घडवलं आहे.
*खासगी जीवनात मात्र त्यांना फारसं सुख लाभलं नाही. दिल्लीस्थित व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी रेखा यांनी लग्नगाठ बांधली होती. पण, १९९१ मध्ये मुकेश यांनी आत्महत्या केली. पुढे विनोद मेहरा, अमिताभ बच्चन आणि संजय दत्त यांच्याशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं. बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चांविषयी आजही अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळतं.