गणरायापुढे नतमस्तक झाल्यामुळे अभिनेत्रीवर आगपाखड
धर्माच्या भिंती अजूनही समाजात मोठे अडथळे निर्माण करत आहेत.
मुंबई : गणपती बाप्पा मोरया, असं म्हणत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या लाडक्या गणारायांचे फोटो शेअर केले. यामध्ये काही सेलिब्रिटींनी बाप्पासोबत चक्क सेल्फीही काढला. गणपती म्हणजे प्रत्येकाच्या मनात खास स्थान असणारं दैवत. अशा या कृपासागरापुढे जात, धर्म, पंथ असा कोणताही भेदभाव केला जात नाही. पण, समाजाकडून मात्र या गोष्टी अद्यापही तितक्याश्या प्रमाणात स्वीकारल्या गेलेल्या नाहीत. एका बॉलिवूड अभिनेत्रीसमोर उभी ठाकलेली परिस्थिती पाहता हेच लक्षात येत आहे.
सैफ अली खान याची लेक म्हणजेच अभिनेत्री सारा अली खान हिनेही सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सारा गणपती बाप्पासोबत मोठ्या आनंदात दिसत आहे. बाप्पा तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करुन तुम्हा सर्वांच्याच आयुष्यात आनंद, सकारात्मकता आणि यशाची उधळण करो, असं कॅप्शनही तिने या फोटोसह दिलं होतं.
हा फोटो शेअर केल्यानंतर तिला जो अनुभव आला तो मात्र निराशाजनक होता. 'नावातून अली खान हटव... इस्लामची बदनामी करु नकोस...', 'तू हिंदू आहेस की मुस्लिम?', 'तू एक मुस्लिम मुलगी आहे...', 'काहीतरी भान ठेवून वाग, कृपया असं काही करु नकोस.....', अशा अनेक प्रतिक्रिया तिच्या या फोटोपुढे करण्यात आल्या.
अनेकांनी तर साराच्या खासगी आयुष्यावरही यावेळी टीका केली. 'तुझा फोटो कार्तिकनेच काढला असावा...' असं म्हणत, 'तुम्ही फक्त नावापुरताच मुस्लिम आहात, कामं तर सर्व हिंदूंची करता.... लाज वाटली पाहिजे तुम्हाला...' या शब्दांत नेटकऱ्यांनी साराला निशाण्यावर घेतलं. या साऱ्यावर तिने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, सर्वधर्म समभावाची शिकवण दिल्या जाणाऱ्या भारतात आजही धर्माच्याच भिंतीच जास्त भक्कम केल्याचं पाहायला मिळत आहे.