मुंबई : दिवाळी आणि भाऊबीजच्या निमित्ताने सोशल मीडियावर अनेकांनीच काही सुरेख फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये कुठे नात्यांची झलक पाहायला मिळाली, तर कुठे लहानग्यांच्या कलागुणांचीही प्रचिती आली. अशा या उत्साही वातावरणामध्ये अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांच्या लाडक्या लेकीने म्हणजेच इनाया नॉमी खेमू हिनेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर खुद्द कुणाल खेमू यानेच एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याची बहीण भाऊबीजेनिमित्त त्याला ओवाळताना दिसत आहे. ओवाळतानाच कुणालची बहीण गायत्रीमंत्र बोलताना दिसते. तिने गायत्री मंत्र म्हटल्यावर चिमुरडी इनायासुद्धा तिच्या गोड आवाजात आणि अतिशय सुरेख अंदाजात गायत्री मंत्र म्हणताना दिसत आहे. 


काहीसे अस्पष्ट तरीही तितकेच मनाला स्पर्श करणारे तिचे शब्द अनेकांचीच मनं जिंकून जात आहेत. एक वडील म्हणून खुद्द कुणालही त्याच्या मुलीचा तहा अंदाज पाहून भारावला असणार यात शंका नाही. 



सेलिब्रिटींच्या मुलांविषयी सोशल मीडियावर कायमच कुतूहल पाहायला मिळतं. मुख्य म्हणजे सेलिब्रिटी किड्सचं संगोपन नेमकं कसं होतं असा प्रश्नही चाहत्यांच्या वर्तुळातून उपस्थित केला जातो. इनायाचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनाच त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं असणार यात शंका नाही.