मुंबई : गेल्या काही काही दिवसांपासून बऱ्याच कारणांनी चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे. यावेळी तिची कोणती चूक किंवा वक्तव्य यामागचं कारण ठरत नाही, तर तिचा एक नवाकोरा लूक या चर्चांना वाव देत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवदीप सिंग दिग्दर्शित 'लाल कप्तान' या चित्रपटातील तिचा लूक नेमका कसा असणार, याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही तिच्या आवाजाचीच झलक सर्वांच्या भेटीला आली होती. ज्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड ताणल्यानंतर अखेर सोनाक्षीच्या नव्या रुपावरुन पडदा उचलण्यात आला आहे. 



खुद्द सोनाक्षीने मोठ्या अनोख्या अंदाजात 'लाल कप्तान' या चित्रपटातील तिचा लूक सर्वांच्या भेटीला आणला आहे. यामध्ये 'दबंग गर्ल' कधीही न पाहिलेल्या अंदाजात दिसत आहे. 


'नूर बाई' असं सोनाक्षी साकारत असलेल्या पात्राचं नाव आहे. तेव्हा आता ही 'नूर बाई' चित्रपटाच्या कथानकाला कोणत्या वळणावर नेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'लाल कप्लान'मधील सोनाक्षीचा एकंदर लूक पाहता, यामध्ये ती एका सुरेख आणि सुशोभित अशा आसनावर मोठ्या नजाकतीने बसल्याची दिसत आहे. तिचा अर्धा चेहरा यामध्ये जाळीदार कापडाने लपवण्यात आला आहे. त्यातून तिची रोखलेली नजर थेट काळजालाच भिडत आहे. 



अभिनेता सैफ अली खान याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'लाल कप्तान' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये सैफच्या अभिनयाने आणि चित्रपटाची अवघ्या काही मिनिटांची झलक पाहून आतापासूनच प्रेक्षकांमध्ये त्याविषयीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.



आनंद एल राय यांच्या यल्लो प्रोडक्शन्सची निर्मिती असणारा हा चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये सैफ आणि सोनाक्षी यांच्याशिवाय मानव वीज, झोया हुसैन, दीपक डोब्रियाल हे कलाकारही झळकणार आहेत.