मुंबई : रुपेरी पडदा आणि कलाविश्वापासून काही दिवसांपासून दूर असणाऱ्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी एक सुरेख असं नातं टिकवून ठेवलं आहे. सोनाली काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये असून ती कॅन्सरवर उपचार घेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजाराशी झुंज देणारी ही बी- टाऊनची देखणी अभिनेत्री तिच्या प्रकृतीविषयी आणि काही रंजक गोष्टींविषयी नेहमीच सोशल मीडियावर फोटो, एखादा व्हिडिओ पोस्ट करते. मग ती प्रियांका चोप्राची ब्रायडल शॉवर पार्टी असो किंवा कॅन्सरवर उपचार घेताना येणारी एखादी अडचण असो. 


सोनालीने सध्याही एक अशीच पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने एका पुस्तकाविषयी माहिती दिली आहे. शेअर केलेल्या फोटोत सोनालीच्या हातात ते पुस्तक दिसत आहे. त्यासोबतच तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये आणखीही बरंच काही लिहिलं आहे. 


तिच्या या पोस्टमध्ये लक्ष वेधतेय ती म्हणजे एक अशी ओळ ज्या माध्यमातून तिने केमोथेरपीदरम्यान तिच्या अवयवांवर होणऱ्या परिणामांविषयीसुद्धा लिहिलं आहे. 


'अमुक एक पुस्तक वाचण्यासाठी मी जरा जास्तच वेळ घेतला किंबहुना जास्त वेळ गेला. कारण केमोथेरपीमुळे माझ्या डोळ्यांवर त्याचे परिणाम झाले होते. नजर कमकुवत झाली होती. पण, आता मात्र त्यात बरीच सुधारणा आहे, किंबहुना सर्वकाही पूर्वपदावर आहे', असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 



सोनालीची ही पोस्ट अवघ्या काही क्षणांतच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आणि पुन्हा एकदा सुरुवात झाली ती म्हणजे तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्यात याविषयीच्या प्रार्थनांना. चाहत्यांच्या वर्तुळात बरीच लोकप्रिय असणाऱ्या या अभिनेत्रीने लवकर मायदेशी परतावं आणि तिची प्रकृती उत्तम रहावी अशीच प्रेक्षकांची, सोनालीच्या कुटुंबीयांची आणि तिच्या मित्रपरिवाराची कामना आहे.