`माझ्यासाठी ते तीन महिने नरकाप्रमाणे, कारण...`; सोनम कपूरचा पतीबद्दल मोठा खुलासा
Sonam kapoor On Anand Ahuja: सोनम कपूरने मातृत्वाचा अनुभव, त्यानंतर जीवनात आलेले चढ-उतार आणि नवऱ्याचे आजारपण याबद्दल भाष्य केले आहे.
Sonam kapoor On Anand Ahuja: दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. बॉलिवूडमधील अनेक कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करताना दिसले. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही सध्या तिचा पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. त्यात तिच्या एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यात तिने २०२३ या वर्षात तिच्या आयुष्यात आलेल्या चढ-उतारांबद्दल सांगितले आहे.
सोनम कपूर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिने तिचे वर्षभरातील काही फोटो पोस्ट केले आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने मातृत्वाचा अनुभव, त्यानंतर जीवनात आलेले चढ-उतार आणि नवऱ्याचे आजारपण याबद्दल भाष्य केले आहे.
काय म्हणाली सोनम कपूर?
"माझ्यासाठी २०२३ हे वर्ष फारच चढ-उतार असणारे ठरले. या वर्षात मी आणि आनंदने आम्ही आई-वडील झाल्याचा स्वीकार केला. जेव्हा तुम्ही आई होता, तेव्हा तुम्ही फार आनंदी असता, पण त्याबरोबरच तुम्हाला एक वेगळी भीतीही सतावत असते. मी भावनिक, शारीरिक आणि अध्यात्मिकरित्या पूर्णपणे बदलले आहे. माझ्यासाठी हा पूर्णपणे नवीन अनुभव होता.
गेल्यावर्षी माझे पती आनंद यांना गंभीर आजार झाला होता. आनंदला जो आजार झाला, तो इतका दुर्मिळ होता की त्याची माहिती डॉक्टरांकडेही नव्हती. माझ्यासाठी ते तीन महिने नरकाप्रमाणे होते. पण देवाची कृपा आणि डॉक्टरांचे अथक प्रयत्न यामुळे आनंद आता पूर्णपणे बरा झाला आहे. मी आता माझ्या पतीच्या व्यवसायात मदत करत आहे आणि आता त्यात चांगली प्रगती होत आहे. त्यासाठी मी देवाचे खूप खूप आभारी आहे.
मी खूप नशीबवान आहे की मला इतके प्रेमळ कुटुंब आणि चांगले मित्र मिळाले. मी कामाबरोबरच कुटुंबाला आणि मित्रांनाही वेळ देऊ इच्छिते. त्याबरोबरच मला आशा आहे की एक दिवस या जगाला समजेल की युद्धातून काहीही मिळणार नाही. आतापर्यंत झालेल्या युद्धात ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले, त्यांना देव त्यांना शक्ती देवो, अशी मी प्रार्थना करते.
तसेच जे लोक आता सत्तेत आहेत आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे, ते मात्र राक्षसासारखे वागत आहेत. येत्या नवीन वर्षात जगात शांतता आणि आनंद पसरेल अशी इच्छा व्यक्त करते. त्याबरोबरच मला मिळालेल्या जीवनाबद्दल मी कृतज्ञ आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. खूप खूप प्रेम", असे सोनम कपूरने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान सोनम कपूरने 20 ऑगस्ट 2022 ला तिचा मुलगा वायूला जन्म दिला. त्यानंतर सध्या ती मातृत्वाचा अनुभव घेत आहे. वायूच्या जन्मानंतर सोनमने तिच्या करिअरमधून ब्रेक घेतला आहे. पण लवकरच ती पुन्हा काम सुरु करणार असल्याचे बोललं जात आहे.