मुंबई : कलाकार मंडळींनी आजवर त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरीच गोपनीयता पाळल्याचं स्पष्ट झालं आहे. पण, एका वळणावर आल्यानंतर मात्र हीच कलाकार मंडळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात त्यांच्या खासगी आयुष्यातील अशा काही गोष्टींचा उलगडा करतात ज्या पाहता चाहत्यांनाही धक्का बसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या आयुष्यात सध्या असंच एक वळण आलं आहे. एकल मातृत्व, करिअरमध्ये प्रचंड यश या साऱ्या गोष्टी मिळवल्यानंतर सुष्मिताला अखेर तिचं हक्काचं आणि प्रेमाचं माणूस भेटलं आहे.


४२ वर्षीय सुष्मिता गेल्या काही महिन्यांपासून २७ वर्षीय मॉडेल रॉमन शॉल याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असून येत्या काळात ते दोघंही या नात्याला पुढच्या वळणावर नेणार असल्याची चिन्हं आहेत. 


'डीएनए'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सुष्मिता आणि रॉमन एका फॅशन शोदरम्यान भेटले तेव्हापासून या साऱ्याची सुरुवात झाली. त्यांनी लग्नाविषयी चर्चाही केली आहे. किंबहुना सर्व गोष्टी ठरवल्याप्रमाणे झाल्यास पुढच्या वर्षी ते लग्नगाठ बांधतील, अशी माहिती सुष्मिताच्या मित्रमंडळींपैकीच एका व्यक्तीने  दिली.


रॉमनने सुष्मिताला प्रपोज केलं असून तिने त्याला होकारही दिला आहे. किंबहुना सध्या ते दोघंही लग्न करण्यास कोणती तारीख योग्य असेल याच्याच विचारात आहेत. पुढच्या वर्षीच्या हिवाळ्यात ते विवाहबंधनात अडकणार असल्याचं कळत आहे. 


फक्त सुष्मिताच नव्हे, तर तिच्या दोन्ही मुलीसुद्धा रॉमन आणि तिच्या नात्यासाठी तयार झाल्या आहेत. रिनी आणि अलिशा या तिच्या मुलींसोबत आणि सुष्मिताच्या मित्रपरिवारासोबत रॉमन शक्य तितका वेळ व्यतीत करत असून हे नातं आणखी दृढ करण्याच्या प्रयत्नान असल्याचं दिसत आहे. 


खुद्द सुष्मिताही सोशल  मीडियावर रॉमनसोबतचे फोटो पोस्ट करत असून प्रत्येक फोटचं कॅप्शन हे बरंच काही सांगून जातं. त्यामुळे बी- टाऊनमध्ये येणाऱ्या वर्षातही लग्नसराईचे हे वारे वाहतच राहणार आहेत, असंच म्हणावं लागेल.