अनू मलिकसोबत काम करण्याविषयी तनुश्रीचा गायिकेला सवाल
बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेची सुरुवात तनुश्रीने केली होती.
मुंबई : गायक आणि संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांच्या एका रिऍलिटी शोमधील सहभागावर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. 'इंडियन आयडॉल' या रिऍलिटी शोचं प्रसारण करणाऱ्या वाहिनीवर तोफ डागली आहे. वाहिनीला व्यक्तींच्या भावनेशिवाय टीआरपी महत्त्वाचा आहे का, असा प्रश्न तिने उपस्थित केला.
वाहिनीवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत तनुश्रीने 'मिड-डे'शी संवाद साधताना तिचं मत मांडलं. 'सोनी वाहिनी ही एक अशी वाहिनी होती, ज्यावर कौटुंबीक महत्त्वं असणारे कार्यक्रम दाखवले जायचे, त्याच वाहिनीवर अशा एका व्यक्तीला रिऍलिटी शोच्या परीक्षकपदी ठेवण्यात आलं आहे ज्याच्याविरोधात अनेक उच्चभ्रू महिलांनी आवाज उठवला होता, शोषण केलेल्या काही प्रसंगांना वाचा फोडली होती. हे धक्कादायक आहे', असं तनुश्री म्हणाली.
गैरवर्तणूक करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यांची शिक्षा व्हायला नको का, असा प्रश्न उपस्थित करत तिने संतापाचा सूर आळवला. फक्त अनू मलिकच नव्हे, तर गायिका नेहा कक्कर या सर्व प्रकरणी मौन का बाळगत आहे, असा सवालही तिने पुढे केला.
कार्यक्रमात एका स्पर्धकाने नेहाचं चुंबन घेतल्याची बाब प्रकाशात आणत तिनेही एक प्रकारच्या शोषणाचा सामना केल्याचं म्हणत अनू मलिक यांच्यासोबत काम करणं हा सर्वस्वी तिचा निर्णय़ असल्याचंही तिने स्पष्ट केलं. नेहाच्या भूमिकेविषयी तनुश्रीचा सूर फारसा समाधानकारक नव्हता. यादरम्यान तिने अनू मलिक यांचा उघडपणे विरोध करणाऱ्या गायिका सोना मोहापात्राचं समर्थन केलं.