मुंबईतील पाणीसंकटानं अमिताभ बच्चनही बेजार; म्हणाले....
आजचा दिवस जरा अडचणींचा होता...
मुंबई : मुंबईमध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या शहराती विविध समस्यांपासून पाठलाग सोडवता आलेला नाही. कोणासाठी वाहतूक कोंडी , तर कोणासाठी गर्दी, कोणासाठी रस्त्यांवरील खड्डे तर कोणासाठी पाणीटंचाई, अशा एक ना अनेक समस्या मुंबईकरांच्या समोर दर दिवसाआड उभ्या राहतात.
मोठेमोठे सेलिब्रिटीही या समस्यांचा थोड्याफार प्रमाणात सामना करतात. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी लिहिलेल्या ब्लॉगमधून त्यांनी असाच काहीसा सूर आळवला आहे. आपल्या घरी पाणी पुरवठ्याच्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी ब्लॉगमधून लिहिलं.
'फार मेहनत लागलीये आणि मला असं वाटतंय की. उद्या अखेरीपर्यंत यावर काही तोडगा निघेल. याचा वापरही होईल. पाहू पण काय होतं ते.... आज उशीर झाला, आज शरीरही फार थकलं आहे. त्यामुळे आज नेहमीच्या तुलनेत जरा जास्तच आधी केबीसीच्या चित्रीकरणासाठी गेलो होतो. सकाळी 6 वाजल्यापासून उठलो आहे, फक्त घरामध्ये पाणी मिळवण्यासाठी', असं त्यांनी ब्लॉ़गमध्ये लिहिलं.
पुढं बच्चन म्हणाले, 'यंत्रणा पुन्हा सुरु झाली आहे. मलाही त्याच्याशी जोडलं जाण्याचा वेळ मिळत आहे. पुन्हा कामावर जायचं आहे. वॅनिटीमध्ये तयार व्हायचंय. देवा किती ही अडचण. तुम्हा सर्वांना घरगुती गोष्टींमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी माफी मागतो. पण, ठीक आहे.... आजचा दिवस जरा अडचणींचा होता.'
आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बिग बी कायमच प्रेक्षक आणि चाहत्यांशी जोडले जातात. त्यांच्याशी एक प्रकारे संपर्क साधतात. महानायक बच्चन यांनी 17 एप्रिल 2008 ला पहिला ब्लॉग लिहिला होता. कामाच्या बाबतीत सांगावं तर, त्यांचा 'चेहरे' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ते या चित्रपटाच्या प्रसिद्धीतही व्यग्र असल्याचं दिसून येत आहे.