मुंबई: गेली काही वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर असणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर खळबळजनक आरोप केले. ज्यानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अभिनेत्रींशी गैरवर्तणूक करणं नानांचा स्वभावच आहे आणि याची उदाहरणं अनेकदा पाहायला मिळाली आहेत, असं तिने ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नानांनी आपल्याशीही असभ्य वर्तन केल्याचं ती म्हणाली. तनुश्रीने नानांसोबत नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य याच्यावरही आरोप करत ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या वेळी त्याने निर्माता- दिग्दर्शकांशी हातमिळवणी केल्याचा आरोप त्याच्यावर केला.


तनुश्रीच्या या सर्व आरोपांना फेटाळून लावत गणेशने माध्यमांकडे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


तिने केलेल्या आरोपांना फेटाळून लावत तो म्हणाला, ‘सर्वप्रथम तर ती सांगत असलेल्या घटनेला बरी वर्षे उलटली असल्यामुळे मलाही आता नीट काही आठवत नाही. पण, त्या दिवशी चित्रपटाच्या सेटवर काहीतरी झालं होतं. ज्यामुळे चित्रीकरणही साधारण तीन तासांसाठी थांबवण्यात आलेलं. काहीतरी गैरसमज नक्कीच झाला होता. पण, मी सांगू इच्छितो की, ती सांगत असल्याप्रमाणे नाना काहीच म्हणाले नव्हते. त्यांनी कोणत्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना चित्रपटाच्या सेटवर बोलवलं नव्हतं. असं कधी झालंच नव्हतं.’


नाना पाटेकर यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे असल्याचं सांगत त्यांनी आजवर अनेक कलाकारांना मदत केली असल्याची गोष्ट गणेशने अधोरेखित केली.


गणेशच्या प्रतिक्रियेनंतर आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणी खुद्द नाना कधी आणि काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.