राणी मुखर्जीशी लग्न करण्यासाठी आदित्य चोप्राने सोडलेले घर
राणी मुखर्जी आज 40वा वाढदिवस साजरा करत आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्याच आवाजाने स्वत:ची ओळख बनवणारी राणी मुखर्जी आज 40वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिर खानच्या 'गुलाम' चित्रपटात राणी मुखर्जीचा आवाज डब केला असल्याचं फार कमी लोकांना माहित आहे. 'गुलाम' चित्रपटाच्या मेकर्सना असं वाटत होतं की राणीचा आवाज प्रेक्षकांना आवडणार नाही. परंतु 1998 मध्ये आलेल्या करण जौहरच्या 'कुछ कुछ होता है' चित्रटातून राणीने बॉलिवूडमध्ये वेगळीच उंची मिळवली. राणी मुखर्जीने लग्न तसंच एक मुलगी झाल्यानंतरही इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची जागा राखली आहे.
21 मार्च 1978 मध्ये बंगाली कुटुंबात राणी मुखर्जीचा जन्म झाला. राणीचे वडील राम मुखर्जी चित्रपट दिग्दर्शक होते आणि आई कृष्णा मुखर्जी पार्श्वगायिका होती. राणीने 1996 मध्ये वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या बंगाली 'बियेर फूल' या चित्रपटातून आपल्या करियरची सुरूवात केली. त्यानंतर 'बियेर फूल' हाच चित्रपट हिंदीमध्ये 'राजा की आएगी बारात' या नावाने बनवण्यात आली आणि या चित्रपटात राणीने प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट खूप चालला नाही परंतु इंडस्ट्रीमध्ये राणीला काम मिळू लागलं.
1998 मध्ये आमिर खानसोबत विक्रम भट्ट यांच्या 'गुलाम' चित्रपटाने राणीला ओळख मिळवून दिली. 1998 साली प्रदर्शित झालेल्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटातून टीना मल्होत्रा या भूमिकेने राणी मुखर्जीला प्रसिद्धीझोतात आणलं. राणी मुखर्जीच्या आधी टीना मल्होत्रा भूमिका ट्विंकल खन्नाला ऑफर करण्यात आली होती परंतु ट्विंकलने याला नकार दिल्याने ही भूमिका राणीच्या पदरात पडली.
राणी मुखर्जीने 'बादल', 'बिच्छू', 'हे राम', 'हर दिल जो प्यार करेगा', 'कही प्यार ना हो जाये', 'चोरी चोरी चुपके चुपके', 'नायक: द रीयल हिरो', 'बस इतना सा ख्वाब है' यांसारखे चित्रपट केले. परंतु या चित्रपटातून राणीला फार यश मिळालं नाही. त्यानंतर शाद अलीच्या 2002 साली आलेल्या 'साथिया' चित्रपटाने राणीच्या करियरला एक वेगळी उंची मिळवून दिली. या चित्रपटासाठी राणीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. राणीने 'युवा', 'ब्लॅक' आणि 'नो वन किल्ड जेसिका' चित्रपटासाठीही फिल्मफेयर पुरस्कार मिळवला आहे.
राणीने 21 एप्रिल 2014 साली पॅरिसमध्ये निर्माता, दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत गुपचुप लग्न केलं. आदित्य चोप्राने पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यादरम्यान राणी आणि आदित्य यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा होती. यामुळे प्रेम चोप्रा नाखूश होते. यामुळे नाराज होऊन आदित्य चोप्रा घर सोडून हॉटेलमध्ये राहू लागले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंतर आदित्य आणि राणी यांचं लग्न झालं. 9 डिसेंबर 2015 मध्ये आदित्य-राणीला 'अदिरा' मुलगी झाली.