मुंबई : जीवनात काही गोष्टी किंवा काही प्रश्न आणि शंका अशा असतात ज्या सर्वांसमोर बोलता येत नाहीत. मुळात काळ कितीही पुढे गेला असला तरीही काही मुद्दे मात्र आजही चारचौघात बोलताना आपल्या मनात संकोचलेपणा येतोच. (sex education)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे मुद्दे कोणते, तर लैंगिक शिक्षण किंवा लैंगिक संबंधांविषयीचे काही प्रश्न आणि त्याबाबतचे न्यूनगंड. अशाच मुद्द्यांवर प्रकाश टाकत दिग्दर्शक इम्तियाज अली यानं एक नवाकोरा शो प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचं ठरवलं आहे. 


लोकांच्या लैंगिक संबंधांविषयीच्या समस्यांवर काम करणाऱ्या आणि तोडगा काढणाऱ्या एका डॉक्टरभोवती या शोचं कथानक फिरणार आहे. 


नुकताच या शोचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यामध्ये काही लोकं त्यांच्या आयुष्यात उदभवलेल्या 'त्या' प्रश्नांमुळं व्यथित झाल्याचं पाहायला मिळत आहे. 



मुख्य म्हणजे या सर्व मंडळींना कोण ना कोण डॉ. अरोरा यांच्याकडे जाण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. आता हे डॉक्टर आहेत तरी कोण, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


तेव्हा आता सहजासहजी बोलल्या न जाणाऱ्या प्रश्नांवर आता हे डॉक्टर नेमका तोडगा कसा काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तोवर वाट पाहा, कारण जसं या शोची लॉगलाईन म्हणते, 'स्त्री हो या पुरुष; सब को करे दुरुस्त'.