करिना कपूरसमोर बनावट कार प्रकरणामुळे नवं संकट उभं
बॉलिवूड सेलेब्सच्या नावावर फसवणुकीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
मुंबई : बॉलिवूड सेलेब्सच्या नावावर फसवणुकीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. पण अलीकडेच असं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. बॉलिवूडमध्ये 'बेबो' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री करीना कपूर खानच्या नावानं नोंदणीकृत कार केरळमध्ये सापडली आहे. करीना कपूर खानच्या नावाने कार बनावट नोंदणीकृत विक्रेत्याकडून जप्त करण्यात आली आहे. नोंदणीकृत कागदपत्रं पोलिसांनी जप्त केली आहेत. नोंदणीकृत प्रमाणपत्रात रणधीर कपूर यांचा वडील म्हणून उल्लेख आहे आणि दिलेला पत्ता त्यांच्या हिल रोड, बांद्रा, मुंबई येथील अपार्टमेंटचा आहे.
करीना कपूर खानसोबत वीस आलिशान कार आता केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील चेरथला पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला त्याच्या मालकीचं प्रमाणपत्र आणण्यात अपयश आलं. आरोपी पोलिसांना सांगू शकला नाही की, त्याने मालकी बदलल्याशिवाय त्यांच्याकडून कार कशी घेतली.
गेल्या महिन्यात, बंगळुरूमध्ये परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 10 हून अधिक आलिशान कार जप्त केल्या. ज्यात रोल्स-रॉयस, फेरारी आणि पोर्श सारख्या ब्रँडचा समावेश होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी एकाचं नाव मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या नावावर आहे.
तपासादरम्यान, परिवहन विभागाला आढळलं की, बेंगळुरू शहरात अनेक आयात केलेल्या कार परवानाशिवाय चालत होत्या आणि त्या गाड्यांचा रोड टॅक्स भरला जात नव्हता. ही बाब समोर आल्यानंतर वाहतूक पोलिसांसह वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई करून 10 पेक्षा जास्त सुपर कार जप्त केल्या.
रस्ते कर न भरणं, आयात शुल्क, खोटी नोंदणी, बनावट कागदपत्रं आणि जुन्या मालकाच्या कागदपत्रांसह काही कार अशा अनेक अनियमितता परिवहन विभागाला आढळल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी त्यांची रोल्स रॉयस फँटम विकली होती. जी त्यांना चित्रपट निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी भेट दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये अमिताभ बच्चन यांनी 3.5 कोटी रुपयांचे फॅन्टम बेंगळुरू येथील व्यापारी युसूफ शरीफ किंवा स्क्रॅप बाबूला विकले. तो बंगलोरमध्ये उमरा डेव्हलपर्स नावाची रिअल इस्टेट कंपनी चालवतो.