मतदानाची टक्केवारी कमी का होतेय? नानांचा सवाल
![मतदानाची टक्केवारी कमी का होतेय? नानांचा सवाल मतदानाची टक्केवारी कमी का होतेय? नानांचा सवाल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2019/10/21/354175-723566-nana.jpg?itok=w6o35zRU)
लोकहो.... बाहेर पडा, मतदान करा
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवणडणुकीच्या निमित्ताने पावसाने उसंत घेतलेली असतानाच मतदार राजा मतदानासाठी बाहेर पडला. पण, तरीही मतदानाचा आखजा मात्र काही ठिकाणी समाधानकारक रेषेच्या वर पोहोचलेला नाही. मतदानासाठी उत्साहात बाहेर पडणाऱ्यांमध्ये कलाविश्वातील काही प्रसिद्ध चेहरेही मागे राहिले नाहीत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांचं मत नोंदवल्यानंतर मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन सर्वांनाच केलं आहे.
मतदानाची टक्केवारी कमी का होतेय, मुळात नागरिकांमध्ये हा निराशावाद का आहे?, असा प्रश्न नानांनी उपस्थित केला. 'बाहेर पडा, मतदान करा' असं म्हणत सर्वांसाठीच मतदान हे सक्तीचं केलं गेलं पाहिजे असंही नाना म्हणाले.
लोकशाही राष्ट्र असणाऱ्या भारत देशातील सर्वच नागरिकांनी मतदान केलंच पाहिजे ही बाब मांडण्यासाठी, 'या दिवसाकडे सुट्टीचा दिवस म्हणून पाहू नका' अशी ताकीदही नानांनी दिली. 'मतदान केलं नाही, तर आपल्याला (विकासकामं आणि देशहितवादी महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी) बोलण्याचाही काहीच अधिकार नाही' असं म्हणत नानांनी एक महत्तावाची बाब अधोरेखित केली. मतदान करण्याच्या प्रक्रियेसाठी सध्याच्या घडीला मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत जावं लागतं. पण, ही सारी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करता येणं शक्य आहे का, या पर्यायाविषयीसुद्धा त्यांनी एक प्रश्न निवडणुक आयोगापुढे मांडला आहे.
एक कलाकार म्हणून नव्हे, तर जाणकार आणि जबाबदार नागरिक म्हणून नाना पाटेकर यांनी केलेलं हे आवाहन पाहता आता शेवटच्या काही तासांमध्ये मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.