सुशांतच्या `या` फोटोमागे दडलंय एक गुपित
जाणून घ्या नेमकं काय आहे ते रहस्य
मुंबई : सत्यघटनांपासून प्रेरणा घेत साकारलेल्या चित्रपटांना नेहमीच चाहत्यांनी पसंती मिळालेली आहे. अशाच चित्रपटांमध्ये आता आणखी एका कलाकृतीचं नाव जोडलं जाणार आहे. तो चित्रपट म्हणजे 'केदारनाथ'. अभिषेक कपूर दिग्दर्शित हा चित्रपट आता काही दिवसांनीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जेव्हापासून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान आणि तिच्यासोबत झळकणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या केमिस्ट्रीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली तेव्हापासूनच त्यांची अनेकांनीच प्रशंसा केली.
'केदारनाथ' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक अभिषेक कपूर सादर करत असणारी कथा ही प्रभावी असणाच्या अपेक्षा चाहत्यांनी केल्या आहेत. त्यापूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच खुद्द अभिषेकच त्यासाठीची वातावरणनिर्मिती करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर त्याने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सुशांत मंदिराच्या मागे तपस्या करत असल्याचं दिसत आहे. अभिषेकने या फोटोत दडलेलं रहस्य कॅप्शनच्या माध्यमातून सर्वांसमोर आणलं आहे.
२०१३ मध्ये ज्यावेळी केदारनाथ मंदिर परिसरात महाप्रलय आला होता तेव्हा सर्वत्र एकच कहर माजला होता. याचदरम्यान डोंगरावरुन एक भलीमोठी शिळा घरंगळत येऊन मंदिराच्या पाठी संरक्षक भिंतीप्रमाणे थबकली, ही सत्यघटना त्याने कॅप्शनमध्ये लिहित हे सारंकाही देवामुळे, शंकरामुळेच शक्य झालं असंही त्याने स्पष्ट केलं.
आपला देवावर असणारा विश्वास त्याने या भीमशीळेचं महत्त्वं सांगत सर्वांपर्यंत पोहोचवलं. मुख्य म्हणजे चित्रपटाच्या चित्रीरकणापूर्वी आणि संपूर्ण चित्रीकरणादरम्यानगही केदारनाथची कृपादृष्टी आपल्यावर असल्याचं म्हणत त्याने सुशांतचा हा फोटो पोस्ट केला.