मुंबई :
दिग्दर्शक : अली अब्बास जफर 
कलाकार : सलमान खान, कतरिना कैफ, दिशा पटनी, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर आणि इतर.... 
निर्मिती : रिल लाईफ प्रोडक्शन्स, सलमान खान फिल्म्स, टी सीरिज 
 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारत....' हा शब्द उच्चारताना अभिमानाची भावना मनात आपोआपच घर करुन जाते. अर्थात, देशाचं नाव घेताना हा अभिमान वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण, याच देशाच्या नावाने जेव्हा एका व्यक्तीला ओळखलं जातं तेव्हा.....? दिग्दर्शक अली अब्बास जफर अशाच एका व्यक्तीचा प्रवास प्रेक्षकांपर्यंत घेऊन आले आहेत, ज्याचं नाव आहे 'भारत'. 


२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ओड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा रिमेक असणारा 'भारत' ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. मुख्य म्हणजे यात भाईजान सलमान मध्यवर्ती भूमिकेत असल्यामुळे चाहत्यांसाठी ही ईदीच आहे. कतरिना कैफ, सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ हे कलाकारही 'भारत'च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 


आयुष्याच्या विविध टप्प्यांमध्ये नेमकी कशी वळणं येतात आणि या वळणांवर 'भारत' कसा बदलत जातो, कसा घडत जातो  याचं चित्रण चित्रपटातून करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सलमान वेगवेगळ्या लूक्सम्ध्ये दिसत आहे. अर्ध्याहून अधिक चित्रपट हा भूतकाळात दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये देशाच्या फाळणीचा प्रसंगही पाहता येतो. हा प्रसंग साकारताना बरेच बारकावे टीपले गेल्याचं लगेचच लक्षात येतं. फाळणीनंतर काही वर्षे उलटण्यानंतर सत्तरच्या दशकामध्ये सलमान एका सर्कशीत काम करण्यास सुरुवात करतो. जिथे तो काही साहसी कृत्यंही करताना दिसतो. इथे सलमान आणि दिशा पटनी यांची केमिस्ट्री चाहत्यांची मनं जिंकते. 


चित्रपटाचं कथानक पुढे जातं, आणि कतरिना पडद्यावर झळकते. कतरिना आणि सलमानची केमिस्ट्री ही 'भारत'ची जमेची बाजू. सलमानचं नुसतं कतरिनाकडे पाहण, स्मितहास्य देणं हे सारंकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं. त्यातच भारतच्या खास मित्राच्या रुपात झळकणारा सुनील ग्रोव्हरही चित्रपटात त्याची वेगळी छाप पाडण्यात यशस्वी ठरतो. एकिकडे सलमान- कतरिनाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री असतानाच दुसरीकडे आपल्या अंदाजात प्रेक्षकांची मनं जिंकणं हे तसं आव्हानच. पण, अली अब्बास जफरने ती गोष्टही साध्य करण्याची संधी सुनीलला दिली आहे. 



काळानुरुप कथानकात होणारे बदल, कलाकारांच्या पेहरावापासून त्यांच्या लूकमध्ये होणारे बदल हे पाहणं मनोरंजक ठरतं. असं असलं तरीही मनोरंजनाची ही थाळी साहसी दृश्य, रोमॅन्स, गूढ,  विनोद असे विविध घटक असूनही काहीशी अपूर्ण वाटते. पण, पुन्हा तिच गोष्ट... सलमानचं नुसतं पडद्यावर असणंच हे सारंकाही इतक्या सहजतेनं दूर सारतं की लक्षातही येत नाही. 


चित्रपटातील संवाद आणि गाणी प्रेक्षकांची मनं जिंकतात. मग ते 'स्लो मोशन' असो किंवा, 'चाशनी'. 'जितने सफेद बाल मेरे सर और दाढी मे हैं, उससे कही ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रही है... ', असं म्हणणारा 'भारत' काही औरच. त्याच्या डोळ्यांतील चमक पाहता सलमानप्रती चाहत्यांचं इतकं वेड का आहे, याचा सहज अंदाज लावता येतो. कलाकारांच्या वाट्याला आलेल्या भूमिका प्रत्येकाने मोठ्या समर्पकपणे निभावल्या आहेत. त्यामुळे चित्रपट पाहताना जाणवणाऱ्या त्रुटी या फार काळ मनात घर करत नाहीत हे खरं असलं तरीही त्रुटी आहेत हे नाकारता येत नाही. तेव्हा हा मनोरंजनाचा परफेक्ट पॅक असणारा सलमानचा भारत एकदा नक्की पाहावा असाच आहे.... कारण, 'ईद है और सलमान की फिल्म नही देखी तो क्याही ईद मनाये....?'


- तीन स्टार