मुंबई : झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री आलिया भट्ट आणि सहकलाकारांचा तगडा अभिनय या ट्रेलरमधून पाहायला मिळाला. अवघ्या काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये चित्रपटाचा सारांश मांडत काही अफलातून संवादही प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'बम्बईयाँ हिंदी' म्हणून जी भाषा प्रचलित आहे, किंवा मुंबईकरांच्या हिंदी भाषेला ज्या अर्थी ओळख आहे, त्याचा वापर, त्यातही मुंबईच्या एका अशा भागात राहणाऱ्या वर्गाकडून वापरली जाणारी भाषा, त्यांचं दैनंदिन आयुष्य यावरही ट्रेलरमधून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 'मर जायेगा तू....', 'अपना टाईम आयेगा....', 'औकात क्या है तेरी....' असे संवाद सध्या नेटकऱ्यांची मनं जिंकत आहेत. 






चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारे मीम्स पाहून असं म्हणणं वावगं ठरणार नाही. रोजच्या आयुष्यातील प्रसंगांच्या वेळी 'गली बॉय' या चित्रपटातील हे अफलातून संवाद कशा प्रकारे अगदी समर्पकरित्या वापरले जातील, याचंच धमाल उदाहरण या मीम्समध्ये पाहायला मिळत आहे. 





'अपना टाईम आयेगा', म्हणत रणवीर प्रेक्षकांची मनं जिंकणार का, हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर म्हणजेच १४ फेब्रुवारीनंतर स्पष्ट होणार आहे. तूर्तास त्याच्या या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमधील हे मीम्स मात्र नेटकऱ्यांची आणि प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रॅपर डिव्हाईन आणि नॅझी यांच्या कारकिर्दीवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला असून कलाकारांचा एक वेगळा आणि भारतात काहीसा दुर्लक्षित राहिलेला वर्ग प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. शिवाय एका वेगळ्याच मुंबईचं दर्शनही या चित्रपटातून होणार आहे.