Manikarnika song : युद्धभूमीतील पराक्रमासाठी झाशीची राणी सज्ज, `विजयी भव....`
अन् प्रारंभ झाला एका रणसंग्रामाला.....
मुंबई : अवघ्या काही दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच पार पडला. ज्यानंतर चित्रपटातील 'विजयी भवं' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. नि:स्वार्थ देशभक्ती आणि परकीयांविषयी मनात असणारा संताप या गोष्टी अधोरेखित करत शत्रूचा सामना करण्यासाठी जणू 'विजयी भव' आशीर्वादच ठरत आहे.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत असणारी कंगना या गाण्यातूनही अतिशय प्रभावीपणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, तर भव्य सेट, तगडी स्टारकास्ट आणि अर्थातच हे गाणं अशी सुरेख घडी विजयी भवच्या बाबतीत बसली आहे.
प्रसून जोशी लिखित आणि शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात शब्द आणि चालीचा सुरेख मेळ साधला गेला आहे. त्याशिवाय वैभव तत्ववादी, अंकिता लोखंडे, डॅनी डँग्झोपा यांचा अभिनयही एक वेगळाच उत्साह हे गाणं पाहणाऱ्यांना देऊन जातं.
इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी एका लढ्याची नेमकी सुरुवात कशी केली आणि त्यानंतर त्यांना यात कोणाकोणाचा हातभार लाभला, इथपासून एक मुलगी, पत्नी, आई आणि राणी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास इथपर्यंतचे अनेक बारकावे या चित्रपटातून टीपण्यात आले आहेत. असा हा रणसंग्राम २५ जावेनारीला चित्रपटगृहांमध्ये दाखल होत असून, ही तळपती तलवार आणि ती रोखून धरलेली झाशीची राणी म्हणजेच कंगना प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.