मुंबई : समलैंगिक प्रेमसंबंध, नात्यांमध्ये निर्माण होणारी तेढ आणि या साऱ्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन या विषयांवर 'शुभ मंगल ज्यादा सावधान' Shubh Mangal Zyada Saavdhan या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. प्रदर्शनानंतर कमाईच्या आकड्यांमध्ये योग्य तो समतोल राखत या चित्रपटाने सोमवारच्या दिवशीही चांगली कमाई केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तान्हाजी'मागोमाग सोमवारच्या दिवशी दमदार कमाई करणारा 'शुभ मंगल....' हा चित्रपच २०२० या वर्षातील चौथा चित्रपट ठरला आहे. सोमवारी या चित्रपटाने ३.८७ कोटी रुपयांची कमाई केली. या चार चित्रपटांमध्ये 'स्ट्रीट डान्सर ३डी', 'मलंग' या चित्रपटांचाही समावेश आहे. 


कमाईच्या बाबतीत आयुष्मान आणि जितेंद्र कुमार स्टारर 'शुभ मंगल....'ने दीपिकाच्या 'छपाक', कंगनाच्या 'पंगा' आणि सारा अली खान हिच्या 'लव्ह आज कल' या चित्रपटांना मागे टाकलं आहे. सहसा आठवड्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये चित्रपटांच्या वाट्याला यश येतं. पण, 'शुभ मंगल ज्यादा सावधान'च्या बाबतीत मात्र हे चित्र काहीसं वेगळं दिसत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाही प्रेक्षकांची चित्रपटाला मिळणारी पसंती प्रशंसनीय ठरत आहे. 



पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत


'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाची सर्वच स्तरांतून प्रशंसा केली जात आहे. अतिशय संवेदनशील मुद्द्याला तितक्याच प्रभावीपणे हाताळण्याचं दिग्दर्शकाचं कसब आणि त्याला मिळालेली कलाकारांची साथ यामध्ये विशेष दाद मिळवून जात आहे. या चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल आणि या कलाविश्वाचा भाग होता आल्याबद्दल काही दिवसांपूर्वीच आयुष्यमानने एका मुलाखतीत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली होती.